-श्वेता चिदमलवाड
१९४७ला एका दिवसाच्या विलंबाने २ देश पारतंत्र्यातून मुक्त झाले होते. ते देश म्हणजे भारत आणि पाकिस्तान. जरी या दोन्ही देशांना इंग्रजांच्या तावडीतून सुटका झाली असली, तरी काही वर्षांनी सीमारेषेवरुन होणारा वाद मात्र कायमचाच सुरु झाला. या वादाचे अतिशय खराब रुप पाहायला मिळाले ते १९९९ साली दोन्ही देशांमध्ये झालेल्या कारगिल युद्धात. या युद्धाचे पडसाद फक्त युद्धभूमीवर नव्हे, तर क्रिकेट मैदानावरही उमटले.
त्या युद्धानंतर भारत-पाकिस्तान देशांमधील क्रिकेट एकदम बंद पडले. गेली १९ वर्षे दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध एकही सामना खेळला नव्हता. अशी किती वर्षे आपले संबंध शत्रुत्त्वाचे राहणार. किती झालं तरी पाकिस्तान आपला शेजारी देश आहे. कसंही करुन दोन्ही देशांना परत एकत्र आणायचं, यासाठी तत्कालिन भारतीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी प्रयत्न करायचे ठरवले.
अखेर २००४साली ते वर्ष उजाडले. जेव्हा दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यासाठी वाजपेयींनी लगान चित्रपटातील मार्ग अवलंबला. अर्थातच क्रिकेटचा. सुरुवातीला त्यांनी पाकिस्तानमधील सार्क परिषदेत आपली उपस्थिती नोंदवली आणि भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका खेळवण्याची परवानगी घेतली. त्यानंतर सौरव गांगुलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ ३ सामन्यांची कसोटी मालिका आणि ५ सामन्यांची वनडे मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाणार असे ठरले होते. त्यावेळी संघ व्यवस्थापनाची जबाबदारी रत्नाकर शेट्टींवर सोपवली होती.
इंडियन एक्सप्रेसशी बोलताना रत्नाकर शेट्टी यांनी सांगितले होते की, “पंतप्रधान वाजपेयींचा मुख्य उद्देश होता तो दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याचा. पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यापुर्वी भारतीय संघ वाजपेयींना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेला होता. तेव्हा वाजपेयी म्हणाले होते, आपल्याला फक्त खेळ नाही तर लोकांची मनेही जिंकायची आहेत. वाजपेयींनी तेव्हा भारतीय संघासोबत जवळपास एक तास घालवला होता. त्यांनी संघाला एक बॅट भेट म्हणून दिली होती, ज्यावर संदेश लिहिलेला होता- ‘फक्त खेळ नाही, मनेही जिंका, शुभेच्छा’.”
भेटीनंतर जेव्हा भारतीय संघ घरी जाण्यासाठी रवाना होत होता, तेव्हा ‘हम होंगे कामयाब’ या गीताचे मधुर स्वर मागे ऐकायला मिळत होते. त्या गीताने जणु भारतीय संघातील खेळाडूंमध्ये उत्साह भरला होता. रत्नाकर शेट्टी सांगतात की, “भारतीय संघ जाण्यापुर्वी ते सुरक्षेची तपासणी करण्यासाठी पाकिस्तानला गेले होते. त्यावेळी विमानतळ, रस्ते आणि इतर सार्वजनिक ठिकाणी लोक वाजपेयींचे फोटो घेऊन उभे होते. जेव्हा मी वाजपेयींना या गोष्टीची माहिती दिली की, पाकिस्तानमधील लोकंही तुमच्या निर्णयाने खूप आनंदी आहेत. तेव्हा ते हसत मला म्हणाले, ‘मग आता पाकिस्तानमध्येही निवडणुका लढवणे सोपे जाईल’.”
ते काहीही असो. पण त्या दौऱ्याचा आनंदच खूप वेगळा होता. १९ वर्षांनंतर झालेला तो दौरा इतका गाजला होता की, त्या दौऱ्यातील प्रत्येक खेळाडूच्या प्रत्येक खेळीची आजही आठवण काढली जाते. मग विरेंद्र सेहवागची कसोटीतील ३०९ धावांची खेळी असो किंवा सचिन, द्रविड आणि गांगुलीचे दमदार प्रदर्शन असो. सर्वात विशेष म्हणजे, सर्वांच्या अपेक्षांवर खरे उतरत भारतीय संघाने कसोटी आणि वनडे मालिका दोन्हींतही विजय मिळवला होता. या विजयाने फक्त खेळच नव्हे, तर लोकांची मने जिंकली होती.
हा लेख तुम्हाला कसा वाटला? आम्हाला नक्की कळवा. आमचा ट्विटर आयडी- @Maha_Sports