मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील पुढील मोठी स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफी आहे, जी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च 2025 दरम्यान हायब्रीड मॉडेल अंतर्गत आयोजित केली जाईल. टीम इंडिया स्पर्धेतील आपले सामने दुबईत खेळणार असून उर्वरित संघ यजमान पाकिस्तानमध्ये आपले सामने खेळताना दिसतील. भारतीय संघानं पाकिस्तानचा दौरा करण्यास नकार दिला होता, ज्यानंतर आयसीसीनं मध्यममार्ग शोधून टीम इंडियाचे सामने दुबईत आयोजित करण्याची परवानगी दिली. आता या स्पर्धेसाठी भारतीय संघ कधी जाहीर होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भारतीय संघाच्या घोषणेशी संबंधित अपडेट्सबद्दल आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे सांगतो.
‘स्पोर्ट्स तक’च्या वृत्तानुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सर्व संघांचे संघ घोषित करण्याची अंतिम मुदत 12 जानेवारीपर्यंत आहे. म्हणजेच या दिवसापर्यंत सर्व संघांना त्यांचे संघ घोषित करावे लागतील. त्याचवेळी टीम इंडियाबाबत माहिती मिळाली आहे की, भारतीय संघाची घोषणा 11 जानेवारीला होऊ शकते.
चॅम्पियन्स ट्रॉफी तब्बल 8 वर्षांनंतर खेळली जाणार आहे. या स्पर्धेची मागील आवृत्ती 2017 मध्ये खेळली गेली होती, ज्यामध्ये पाकिस्तान विजेता ठरला होता. पाकिस्ताननं अंतिम सामन्यात भारताचा एकतर्फी पराभव करून ट्रॉफीवर कब्जा केला होता. त्यावेळी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली होता. यावेळी टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेत भाग घेणार आहे.
भारत 20 फेब्रुवारीपासून बांगलादेशविरुद्ध स्पर्धेतील आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. दुबईत 23 फेब्रुवारीला होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ब्लॉकबस्टर सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उपांत्य फेरीचे सामने अनुक्रमे 4 आणि 5 मार्चला होतील तर अंतिम सामना 9 मार्चला खेळला जाईल. जर भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या उपांत्य फेरीत आणि अंतिम फेरीत प्रवेश केला, तर ते सामने दुबईमध्ये खेळले जातील. भारतीय संघ बाद फेरीत पोहोचू शकला नाही तर सामने पाकिस्तानच्या लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर होतील.
हेही वाचा –
माजी क्रिकेटपटूचा गौतम गंभीरच्या कोचिंगवर सवाल, एकापाठोपाठ एक सांगितल्या अनेक चुका!
“रोहित शर्माने निवृत्ती घेतली तर आश्चर्य वाटणार नाही…”, माजी प्रशिक्षकाच्या वक्तव्यानं खळबळ!
“रोहितने अशाप्रकारे सोडून जाऊ नये”, माजी क्रिकेटपटूचा हिटमॅनला पूर्ण पाठिंबा