भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL) यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. गुवाहाटीमध्ये झालेल्या पहिल्या वनडेत भारताने 67 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामध्ये भारताने विराट कोहलीच्या 113 आणि कर्णधार रोहित शर्माच्या 83 धावांच्या जोरावर 373 धावसंख्येचा डोंगर उभारला होता. यामधील दुसरा सामना गुरूवारी (12 जानेवारी) कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या मैदानावर जेव्हा हे दोन संघ वनडेमध्ये शेवटी समोरा-समोर आले होते, तेव्हा वनडेचा इतिहास बदलला होता.
कोलकातामध्ये 2014ला भारताची श्रीलंकेशी झालेली गाठ कोणी विसरणार नाही. खासकरून तर त्यावेळेचे श्रीलंकेचे गोलंदाज. तेव्हा रोहित शर्मा (Rohit Sharma) नावाचे वादळ आले होते. त्याने त्या मालिकेतील चौथ्या वनडेत 264 धावांची खेळी केली होती. त्याने तिसऱ्या विकेटसाठी विराटसोबत 201 धावांची भागीदारी केली होती.
रोहितने त्या सामन्यात चौकार मारत 151 चेंडूतच 200 धावा पूर्ण केल्या होत्या. ते त्याचे दुसरे वनडे द्विशतक होते. तेव्हा तो वनडेच्या इतिहासात दोन द्विशतक करणारा पहिलाच खेळाडू बनला होता. त्याने 2013मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 209 धावा करत पहिले द्विशतक ठोकले होते.
रोहितने 2014च्या त्या सामन्यात 101 चेंडूत शतक पूर्ण केले तर पुढील शतक त्याने केवळ 50 चेंडूतच पूर्ण केले. त्याच्या या तुफानी खेळीचा शेवट 50व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर झाला. त्याला नुसाव कुलसेरा याने माहेला जयवर्धने याच्याकरवी झेलबाद केले होते. त्याने 173 चेंडूत 264 धावा केल्या होत्या. त्यासाठी त्याने 33 चौकार आणि 9 षटकार मारले होते. आजही ही वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च खेळी आहे.
त्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 5 विकेट्स गमावत 404 धावसंख्या उभारली होती. तेव्हा कर्णधार विराट 66 धावा करत बाद झाला होता. श्रीलंकेच्या संघाने लक्ष्याचा पाठलाग करताना अडखळत सुरूवात केली आणि त्यांचा डाव 251 धावसंख्येवरच संपुष्टात आला होता. तो सामना भारताने 153 धावांनी जिंकला होता.
गुवाहाटीत रोहितची फलंदाजी पाहून तो पुन्हा एकदा कोलकातामध्ये धमाका करण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvSL: दुसऱ्या वनडेत ईशान किंवा सूर्या इन! पिच रिपोर्ट, दोन्ही संघाची संभावित प्लेईंग XI
हैदराबाद एफसी पुन्हा अव्वल स्थान पटकावण्यासाठी सज्ज, चेन्नईयन एफसीचे आव्हान