शुक्रवारपासून (९ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला सुरुवात होत आहे. हा आयपीएलचा १४ वा हंगाम असणार आहे. या हंगामातील पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरुवात होईल.
मुंबई इंडियन्स संघ मागील २ हंगामाचा विजेता तर एकूण ५ वेळचा विजेता संघ म्हणून यंदाचा १४ वा हंगाम खेळण्यासाठी मैदानात उतरेल. तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर अजूनही पहिले विजेतेपद पटकावण्याच्या प्रतिक्षेत आहे. यंदाचा हा हंगाम जरी भारतात होत असला तरी काहीसा वेगळा असणार आहे.
कारण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा हंगाम होत असल्याने प्रेक्षकांना मैदानात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच कोणाही संघ आपल्या घरच्या मैदानावर सामने खेळणार नाही. याबरोबरच यंदाच्या आयपीएल हंगामाचे आयोजन अशा प्रकारे करण्यात आले आहे की जेणेकरुन साखळी फेरीदरम्यान प्रत्येक संघाला केवळ ३ वेळाच प्रवास करावा लागेल.
विशेष म्हणजे यावेळी आठव्यांदा मुंबई संघ आयपीएल हंगामातील पहिला सामना खेळणार आहे. याआधी त्यांनी २००९, २०१२, २०१४, २०१५, २०१६, २०१८ आणि २०२० या सात हंगामात पहिला सामना खेळला होता. यातील २००९ मध्ये ते गुणतालिकेत सातव्या, २०१२ ला तिसऱ्या, २०१४ ला चौथ्या स्थानावर राहिले होते. तर २०१५ ला त्यांनी विजेतेपद मिळवले होते. याबरोबरच २०१६ आणि २०१८ मध्ये ते ५ व्या क्रमांकावर राहिले. तसेच २०२० साली त्यांनी आयपीएलचे ५ वे विजेतेपद जिंकले.
आता पुन्हा एकदा मुंबईचा संघ यावेळी आयपीएल हंगामातील पहिला सामना खेळणार आहे. पण त्यांचा याआधीचा हंगामातील पहिला सामना खेळण्याचा इतिहास पहाता तो काही खास राहिलेला नाही. त्यांना केवळ दोनदाच विजेतेपद मिळवता आले आहे. त्यामुळे आता या हंगामात ते कशी कामगिरी करणार हे पहावे लागेल.
जेव्हाही मुंबई इंडियन्स आयपीएल हंगामातील पहिला सामना खेळला तेव्हा असा होता निकाल –
२००९ – सातवा क्रमांक
२०१२ – तिसरा क्रमांक
२०१४ – चौथा क्रमांक
२०१५ – विजेते
२०१६ – पाचवा क्रमांक
२०१८ – पाचवा क्रमांक
२०२० – विजेते
महत्त्वाच्या बातम्या –
युजवेंद्र चहल बनला अंडरटेकर; ६ फुट ८ इंच उंची असलेल्या खेळाडूबरोबर बनवला भन्नाट व्हिडिओ, एकदा पाहाच
सलामीच्या सामन्यात मुंबई पलटणवर भारी पडणार बेंगलोरची बोल्ड आर्मी? पहा काय सांगतोय आतापर्यंतचा इतिहास






