---Advertisement---

वेळ पडली तेव्हा तीन दिवस फक्त बेसन भात खाऊन लढला हा खेळाडू

On: रविवार, एप्रिल 12, 2020 4:59 PM
---Advertisement---

“विदर्भात आझाद हिंद मंडळाकडून खेळताना अतिशय हालाखीच्या परिस्थितीत आपण दिवस काढले. एक वेळ अशी आली की मी सलग तीन दिवस फक्त बेसन आणि भात खाऊन काढले.” रेल्वेचा राष्ट्रीय कबड्डीपटू श्रीकांत जाधव सांगत होता. खेल कबड्डी डॉट इन (khelkabaddi.in) या वेबसाईटच्या फेसबुक पेजवरून आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना श्रीकांतने आपल्या या संघर्षाची कहाणी सांगितली.

यावेळी एका चाहत्याने श्रीकांतला, “विदर्भातील तुमच्या आठवणी सांगा.” असा प्रश्न विचारल्यावर त्याला उत्तर देताना श्रीकांतने आपली कहाणी उलगडली.

“विदर्भातील सुरुवातीच्या दिवसांत माझ्यावर एक मोठे संकट आले होते. माझ्याकडे जेवायला पैसे नव्हते. मी रूमवर जाऊन बेसन भात खात असे. पैसेच नसल्याने अक्षरशः तीन दिवस तोच खराब झालेला बेसन भात खाऊन मी दिवस काढले. यावेळी जेवण बनवायला तेल, मीठ, गॅस काहीच नव्हते. मी माझी झोपण्याची गादी जाळून चूल पेटवली आणि जेवण बनवले होते.” या संघर्षातून मला बरेच शिकायला मिळाले. यातून तावून सुलाखून बाहेर पडल्यानेच आजचा श्रीकांत जाधव बनू शकला असे त्याने सांगितले.

श्रीकांत सध्या प्रोकबड्डीमध्ये युपी योद्धा संघाकडून खेळतो. जयपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या ६७ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत श्रीकांतने रेल्वेकडून खेळताना विजेतेपद मिळवले. या स्पर्धेत त्याला संघात खेळण्याची कमी संधी मिळाली. मिळालेल्या संधी श्रीकांत ने ९ गूण नोंदवत संघाच्या विजयास हातभार लावला.

श्रीकांत जाधवने आता पर्यत प्रो कबड्डीत जयपूर पिंक पँथर्स (सिजन २), बंगाल वॉरियर्स (सिजन ३ व ४) यु मुंबा (सिजन ५) व यूपी योद्धा (सिजन ६ व ७) या संघाचे प्रतिनिधित्व केलं आहे. श्रीकांत ने प्रो कबड्डीत ७८ सामन्यात ४१३ गुण मिळवले आहेत. तर श्रीकांतच्या नावावर १० सुपरटेन आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---