-अतुल वाघमारे
२००३ आणि २०११ विश्वचषकाच्या दरम्यान क्रिकेटचा एक विश्वचषक झाला होता, तो २००७ मध्ये. वेस्ट इंडीजमध्ये खेळण्यात आलेला तो विश्वचषक कोणत्याही भारतीय चाहत्याला आठवावा वाटणार नाही. जगातील सर्वात मजबूत फलंदाजी फळी असणारा भारतीय संघ स्पर्धेच्या पहिल्याच टप्प्यात पराभूत होऊन बाहेर पडला होता. बांगलादेश आणि श्रीलंकेने भारतीय संघाला पराभूत केले होते.
२० मार्च, २००७ ला आपल्या १८व्या वाढदिवसाच्या ३ दिवसांपूर्वी, त्याच सामन्यात एक १७ वर्षांचा मुलगा असा खेळत होता, की जसे काही त्याला माहितच नाही तो कुठे आणि कोणाविरुद्ध खेळत आहे. भारतीय संघाचा डाव १९१ धावांवर संपुष्टात आला होता. बांगलादेश संघ भारताचे आव्हान घेऊन फलंदाजीला आला होता. बांगलादेशकडून एक अनोळखा मुलगा डावाची सुरुवात करण्यासाठी उतरला. डावाच्या पाचव्या षटकात झहीर खानने शाहरियार नफीसला बाद करत बांगलादेशवर दबाव आणला होता.
त्यानंतर ७व्या षटकात झहीरने १७ वर्षाच्या त्या मुलाला वेगवान बाऊंसर चेंडू टाकला. तो चेंडू त्याच्या मानेवर लागून स्लिपमध्ये उभा असणाऱ्या विरेंद्र सेहवागच्या हातात गेला. संपूर्ण संघ उत्साह साजरा करू लागले. परंतु त्याच क्षणी पंचांनी मान हलवत नकार दिला. तो मुलगा जमिनीवर आपली मान पकडून बसला होता. त्या मुलाचे नाव होते तमीम इकबाल. तोच तमीम ज्याने आज बांगलादेश संघाला मोठी ओळख मिळवून दिली आहे.
सर्व काही ठीक झाले. मग तो पुन्हा खेळण्यासाठी सज्ज झाला. त्या षटकाच्या शेवटच्या २ चेंडूंवर त्याने भन्नाट २ चौकार ठोकले. त्यातील पहिला पॉईंटच्या दिशेने आणि दुसरा पुढे येत सरळ झहीरच्या डोक्यावरून. सर्वांना वाटले हे साधारण आहे. कधी-कधी असे होत असते.
परंतु कर्णधार राहुल द्रविड दूरदृष्टी असणारा व्यक्ती होता. बऱ्याच प्रसंगी पराभूत झालेला सामना कसा जिंकायचा हे त्याला माहीत होते. त्याने ते हेरले होते, की आज या फलंदाजाला रोखणे गरजेचे आहे. नाहीतर हा आज आपल्याला काही जिंकू देणार नाही. त्याने झहीरला ११व्या षटकापर्यंत एका बाजूने गोलंदाजी दिली. परंतु ११व्या षटकात तमीमने ते करून दाखविले, जे कदाचित जगातील मोठ्यात मोठ्या फलंदाजालाही झहीरच्या गोलंदाजीवर जमले नसते. झहीरच्या गोलंदाजीवर फलंदाजी करण्यासाठी येणाऱ्या फलंदाजाचा थरकाप उडत असायचा. षटकातील पाचव्या चेंडूवर तमीम झहीरच्या १३६ पेक्षा अधिक किलोमीटर प्रति तास वेगवान चेंडूवर पुढे येत लाँग ऑनवरून एक षटकार ठोकला. या षटकात त्याने याआधीही २ चौकार ठोकले होते.
त्यानंतर कर्णधार द्रविडने झहीरचे षटक संपविले. तमीमने त्या सामन्यात ५३ चेंडूंचा सामना करताना ५१ धावांची अर्धशतकी खेळी केली होती. मुनाफ पटेलच्या गोलंदाजीवर तमीम झेलबाद झाला. परंतु कमी धावांच्या सामन्यात तमीमने बांगलादेशसाठी मोलाची कामगिरी करत गोष्टी सहज केल्या होत्या. त्यामुळे बांगलादेशने तो सामना ५ विकेट्सने आपल्या नावावर केला होता. या खेळीच्या १३ वर्षांनंतरही तमीम यामध्ये झहीरच्या षटकात ठोकलेला तो षटकार आपला सर्वोत्तम षटकार असल्याचे सांगतो.
World Cup Countdown 🔥
17 days more 🔥
17 – Age at which Tamim Iqbal scored 50 against India – Match 8, March 17, 2007
Youngest player to score a 50 in the World Cups#CWC19 #WorldCupCountDown#StatsByDiwakarVaratharajan pic.twitter.com/ruC5OGc2N1
— Diwakar Varatharajan (@Diwakar_Gullu) May 12, 2019
वनडे क्रिकेट इतिहासात असे केवळ एकदाच झाले नाही. तमीमने पदार्पण केल्यानंतर बांगलादेशने ४ वेळा भारतीय संघाला पराभवाचा रस्ता दाखविला होता. त्यांतील ३ वेळा तमीमच्या कामगिरीमुळे संघाला सामना आपल्या खिशात घालता आला होता.
तमीम बांगलादेश क्रिकेट इतिहासातील दिग्गज फलंदाज आहे. बांगलादेशकडून कसोटीत सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज असून त्याने ४४०५ धावा केल्या आहेत, तर वनडेत त्याने बांगलादेशकडून सर्वाधिक ७२०२ धावा केल्या आहेत.
जेव्हा दुखापतग्रस्त हात घेऊन मैदानावर तमीमने केली फलंदाजी
असे नाही की तमीम केवळ धावांसाठी ओळखला जातो. त्याने आपल्या धडाकेबाज खेळींनीही दाखविले आहे, की तो क्रिकेटमधील हिरा आहे. एक प्रसंग २०१८मध्ये आला. तो म्हणजे २०१८चा आशिया चषक. भारतीय संघ विजयी झाला होता. परंतु त्या स्पर्धेतील पहिला सामना झाला होता, बांगलादेश आणि श्रीलंका संघामध्ये. नाणेफेक झाली आणि तो बांगलादेशच्या पारड्यात पडला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु मलिंगाच्या घातक गोलंदाजीने बांगलादेशचे फलंदाज धूळसपाट होताना दिसत होते.
पहिल्या षटकात लिटन दास आणि शाकिब अल हसन पव्हेलियनच्या दिशेने मार्गस्थ झाले. एका षटकानंतर संघाचा स्कोर होता १ धाव २ बाद. दुसरे षटक सुरु झाले. तमीमने लकमलच्या षटकात एक धाव घेतली. मुशफिकुर रहीमने पाचव्या चेंडूवर एक धाव घेत स्ट्राईक पुन्हा तमीमकडे सोपविली. आता तमीम शेवटच्या चेंडूचा सामना करणार होता. लकमलच्या चेंडूवर तमीमने पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडू सरळ त्याच्या मनगटावर जाऊन लागला. दुखापत झाल्यामुळे तो थेट जमिनीवर बसला.
दुखापत इतकी मोठी होती, की मैदानावर फिजिओ आले आणि तमीमची तब्येत पाहून त्याला मैदानातून बाहेर घेऊन गेले. दुसरे षटक संपता- संपता बांगलादेश संघाचे ३ फलंदाज पव्हेलियनच्या दिशेने मार्गस्थ झाले होते. मुशफिकुरने एक बाजू सांभाळत संघाला एक चांगल्या धावसंख्येपर्यंत नेण्याचे काम करत होता. तेवढ्यात ४७ व्या षटकात बांगलादेश संघाचा ९वा विकेटही पडली. मुशफिकुर खेळपट्टीवर एकटाच राहिला होता. कारण तमीम अगोदरच रिटायर्ड हर्ट होऊन गेला होता. बांगलादेश संघाचा स्कोर होता ९ बाद २२९ धावा. परंतु ३ षटके बाकी होते. श्रीलंकेचे खेळाडू मैदान सोडण्याच्या तयारीत होते.
Tamim Iqbal retired hurt earlier today, but how long is he out for?
More info 👇👇https://t.co/nW2mJ4QKLV pic.twitter.com/l48KktMtCQ
— ICC (@ICC) September 15, 2018
मुशफिकुर ड्रेसिंग रूमकडे अपेक्षेच्या दृष्टीने पाहत होता. तेवढ्यात तमीम हाताला प्लॅस्टर लावून मैदानात येताना दिसला. त्याला मैदानात येताना पाहून कोणालाच विश्वास बसत नव्हता, की रिटायर्ड हर्ट झालेला खेळाडू मैदानात कसा परततोय. प्लॅस्टर लावून खेळण्यास आलेल्या तमीमचा एक हात कसलाच काम करत नव्हता. परंतु इथे फक्त मुशफिकुरला साथ देण्याचा प्रश्न नव्हता, तर जेव्हा तुम्ही खेळपट्टीवर असता, तेव्हा तुम्हाला फलंदाजी करावीच लागते. तमीम आता चेंडूचा सामना करण्यास सज्ज झाला होता. त्याने लकमलच्या षटकापासून चेंडूचा सामना केला. तेदेखील एका हाताने. यानंतर मुशफिकुरने ५० व्या षटकांपर्यंत फलंदाजी करत १४४ धावांच्या मदतीने संघाला २६१ धावांपर्यंत पोहोचण्यास मदत केली होती.
मुशफिकुर आणि तमीमच्या ३२ धावांच्या भागीदारीमुळे बांगलादेश संघाने एक मोठे आव्हान उभे केले होते. शेवटी तमीम नाबाद पव्हेलियनच्या दिशेने परतला. त्यावेळी समालोचकांसमवेत संपूर्ण प्रेक्षक त्याची प्रशंसा करत होते.
बांगलादेशने दिलेल्या २६२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंका संघाला चांगली सुरुवात मिळाली नाही. तसेच, नियमित अंतराने विकेट्स पडत गेल्या आणि श्रीलंकेचा डाव केवळ १२४ धावांवर संपुष्टात आला. अशाप्रकारे बांगलादेश संघाने तो डाव तब्बल १३७ धावांनी आपल्या खिशात घातला होता.
हा लेख तुम्हाला कसा वाटला? आम्हाला नक्की कळवा. आमचा ट्विटर आयडी- @Maha_Sports