आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) चाहत्यांना मोठा उलटफेर पाहायला मिळाला. कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला गेलेला हा सामना झिम्बाब्वेने २३ धावांनी जिंकला. हा निकाल पाहून भारतीय चाहते नक्कीच खूष झाले असतील. त्यामागचे कारणही तेवढेच खास आहे.
या सामन्यात झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १६९ धावा केल्या होत्या. या स्पर्धेत त्यांनी ओमानविरुद्धचा पहिला सामना जिंकला आहे. ते पण काही लिंबू-टिंबू नाहीत हे आजचा सामना जिंकत त्यांनी सिद्ध केले आहे. समोर ऑस्ट्रेलियासारखा बलाढ्य संघ असल्याने झिम्बाब्वेला तो जिंकण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील, असे वाटत होते. त्यांच्या दोन वेगवान गोलंदाजांनी हे काम सोपे केले आणि ऑस्ट्रेलियाचा सुपर ८ मधील पोहोचण्याच्या अडचणीत वाढ केली.
झिम्बाब्वेने १९ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला विश्वचषकात पराभूत केले आहे. जेव्हा हे झाले तेव्हा २००७मध्ये भारत विश्वविजेता बनला होता. इतिहास पाहता जेव्हाही ऑस्ट्रेलिया झिम्बाब्वेकडून हरला तेव्हा भारताने विश्व विजेतेपद जिंकले आहे.
१९८३च्या वनडे विश्वचषकात झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलिया १३ धावांनी पराभूत केले होते. त्यामध्ये झिम्बाब्वेने ६ विकेट्स गमावत २३९ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला २२६ धावसंख्येवरच रोकले होते. २००७च्या टी२० विश्वचषकात झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला ५ विकेट्सने पराभूत केले होते. या दोन्ही काळातील त्या विश्वचषकाचे निकाल पाहिले तर १९८३मध्ये कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदाच वनडे विश्वचषक जिंकण्याची कामगिरी केली होती. २००७च्या टी२० विश्वचषकात भारत एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली विश्वविजेता बनला होता.
झिम्बाब्वे विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याचा निकाल पाहता भारतीय संघ पुन्हा एकदा विश्वविजेता बनेल का नाही, याकडे लक्ष असेल.
आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झिम्बाब्वेचे वेगवान गोलंदाज ब्लेंसिंग मुझाराबानी आणि ब्रॅड इवान्स यांनी सुरूवातीपासूनच ऑस्ट्रेलियावर दबाव निर्माण केला. ६ षटकानंतर ऑस्ट्रेलियाची स्थिती ४ बाद ३८ धावा अशी गंभीर झाली होती. ब्लेसिंगने जोश इंग्लिशला बाद करत विकेट्सचा सपाटा सुरू केला. त्यानंतर ब्रॅडने कॅमरुन ग्रीन आणि ट्रेविस हेड यांना बाद केले. टिम डेविड तर खातेही न उघडता बाद झाला. त्याला ब्लेसिंगने बाद केले आणि अशाप्रकारे ऑेस्ट्रेलियाची मधली फळी उधवस्त झाली.
मुझाराबानी ४ षटकात १७ धावा देत ४ विकेट्स घेतल्याने ‘प्लेयर ऑफ द’ मॅचचा मानकरी ठरला. या स्पर्धेत झिम्बाब्वेने सलग दोन सामने जिंकले आहेत. आता त्यांचा पुढील सामना १७ फेब्रुवारीला आयर्लंडविरुद्ध आहे.






