भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याचा थरार हा अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियममध्ये २६ फेब्रुवारीपासून पाहायला मिळणार आहे. हा सामना डे-नाईट कसोटी सामना असणार आहे. दोन्हीही संघ या मालिकेत १-१ सामना जिंकत बरोबरीत आहेत. त्यामुळे दोन्ही संघांसमोर विजयाचे मोठे आव्हान असणार आहे. अशातच सामना सुरू होण्यापूर्वी या गुलाबी चेंडू कसोटी सामन्यात कोणता संघ उत्कृष्ट कामगिरी करेल? याबाबत इंग्लंड संघाच्या २९ वर्षीय युवा फलंदाज जॅक क्राउले याने वक्तव्य केले आहे.
जलद गोलंदाजांसाठी अनुकूल परिस्थिती
क्राउलेने तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचे नव्हे तर इंग्लंड संघाचे पारडे जड असल्याचे सांगितले आहे. सोबतच इंग्लंडचे पारडे का जड असेल? याबाबत स्पष्टीकरणही दिले आहे. इंग्लिश मिडीयाला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, “या (इंग्लंड संघ) संघाकडे वेगवान गोलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या परिस्थितींमध्ये खेळण्याचा चांगलाच अनुभव आहे. त्यामुळे इंग्लंडच्या तिसरा कसोटी सामना जिंकण्याच्या शक्यता जास्त आहेत.”
जेव्हा त्याला विचारण्यात आले की, जर चेंडू स्विंग होत असेल तर याचा फायदा इंग्लंड संघाला होईल का? यावर उत्तर देत तो म्हणाला, “मला वाटते की परिस्थिती आमच्यासाठी अनुकूल असेल. कारण आमचे खेळाडू यासारख्या परिस्थितीमध्ये खेळतच मोठे झाले आहेत. अशातच तुम्ही बोलू शकता की, भारतीय खेळाडूंच्या तुलनेत आम्हाला या परिस्थितींमध्ये खेळण्याचा अनुभव जास्त आहे.”
“भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजांना खूप चांगलं खेळतात. कारण ते याच परिस्थितीमध्ये मोठे झाले आहेत. तसेच भारतीय संघ खूप मजबूत आहे. परंतु मोटेरामध्ये ज्या प्रकारची परिस्थिती आहे. त्याचा आम्हाला फायदा होऊ शकतो. लाल चेंडूपेक्षा गुलाबी चेंडू जास्त स्विंग होतो. याचा फायदा जलद गोलंदाजांना होऊ शकतो. मला विश्वास आहे की, मागील २ कसोटी सामन्यानंतर जलद गोलंदाजांना गडी बाद करण्याची संधी मिळेल,” असे क्राउलेने शेवटी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या-
अन्यथा संघाच्या नावातून ‘हैदराबाद’ काढून टाकावे लागेल; माजी मंत्रींची ‘ऑरेंज आर्मी’ला धमकी
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत ‘या’ २ बदलांसह उतरेल टीम इंडिया, पाहा संभावित प्लेइंग XI
जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमची भारत, इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनाही भूरळ; पाहा खास ट्विट्स