भारत विरुद्ध वेस्ट इंडीज (ind vs wi odi series) ही मायदेशातील एकदिवसीय मालिका रविवारी (६ फेब्रुवारी) सुरू झाली. उभय संघातील ही मालिका अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळली जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने मोठा विजय मिळवला आणि १-० अशी आघाडी घेतली. रोहित शर्मासाठी नियमित एकदिवसीय कर्णधाराच्या रूपातील हा पहिला सामना होता. एकदिवसीय कर्णधाराच्या रूपात रोहितची सुरुवात ही यापूर्वीच्या दिग्गजांपेक्षा अधिक चांगली झाल्याचे दिसत आहे.
रोहितने या सामन्यात त्याची नियमित एकदिवसीय कर्णधारपदाची सूत्रे हातात घेतली. परंतु, यापूर्वी त्याने १० एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. जेव्हा संघाचा नियमित कर्णधार अनुपस्थित असेल, त्यावेळी रोहितली ही संधी मिळाली होती. रोहित त्याच्या पहिल्या ११ एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा भारतीय कर्णधार बनला आहे. त्याने नेतृत्व केलेल्या आतापर्यंतच्या ११ एकदिवसयी सामन्यांपैकी ९ सामने भारताने जिंकले आहेत. त्याचे हे आकडे सर्वोत्तम आहेत.
विराट कोहलीने नेतृत्व केलेल्या सुरुवातीच्या ११ एकदिवसीय सामन्यांपैकी ८ सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला होता. विरेंद्र सेहवाग आणि अजय जडेजा यांच्या नेतृत्वातील पहिल्या ११ एकदिवसीय सामन्यांपैकी ७ सामन्यांमध्ये संघाने विजय मिळवला होता. तसेच कपिल देव, सौरव गांगुली आणि दिलीप वेंगसरकर या दिग्गज कर्णधारांनी नेतृत्व केलेल्या पहिल्या ११ एकदिवसीय सामन्यांपैकी प्रत्येकी ६ विजय मिळवले होते. यांच्या तुलनेत रोहित शर्माचे आकडे अधिक चांगले आहेत. आता भविष्यात रोहित कर्णधाराच्या रूपात भारतीय संघाला एक वेगळी उंची मिळवून देईल, अशी सर्वांचीच इच्छा आहे.
दरम्यान, वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्याचा विचार केला तर, भारताने यामध्ये सहा विकेट्स आणि २२ षटके शिल्लक ठेऊन विजय मिळवला. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजांनी संघाला अप्रतिम सुरुवात करून दिली. रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे वेस्ट इंडीजचा संपूर्ण संघ अवघ्या १७६ धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर प्रत्युत्तरात भारतीय संघाने २८ षटकांमध्ये चार विकेट्सच्या नुकसानावर लक्ष्य गाठले.
महत्वाच्या बातम्या –
…म्हणून लतादीदींसाठी भारताच्या प्रत्येक सामन्यात दोन तिकिटे राखीव असायची
केवळ ८ धावा करूनही कोहली बनला आणखी एका विक्रमाचा ‘किंग’
रोहितच्या नेतृत्वात २०२२ मध्ये फुटला टीम इंडियाच्या विजयाचा नारळ; वेस्ट इंडीजवर केली ६ गड्यांनी मात