पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला आहे. त्यानं भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये 92.97 मीटर थ्रो करून नवा ऑलिम्पिक रेकॉर्ड कायम केला. त्याच्या या थ्रो मुळे गतविजेत्या भारताच्या नीरज चोप्राला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. पाकिस्तानसाठी हा विजय ऐतिहासिक आहे, कारण हे देशाचं ऑलिम्पिकमधील पहिलं वैयक्तिक सुवर्ण पदक आहे. यापूर्वी पाकिस्ताननं केवळ हॉकीमध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं.
27 वर्षीय अर्शद नदीमची फायनलमध्ये सुरुवात फारशी खास झाली नाही. पहिल्या थ्रो दरम्यान त्याचा रनअप ठीक नव्हता, ज्यामुळे त्याला फाऊल देण्यात आला. मात्र दुसऱ्या प्रयत्नात त्यानं ऑलिम्पिक रेकॉर्डच मोडला. नदीमचा हा थ्रो 92.97 मीटरचा होता, ज्यामुळे त्याचं सुवर्ण पदक जवळपास पक्कं झालं. त्यानं फायनलमध्ये शानदार कामगिरी करत दोन थ्रो 90 मीटरच्या पुढे फेकले. भारताच्या नीरज चोप्रानं त्याची हंगामातील सर्वोत्तम कामगिरी करत 89.45 मीटर थ्रो केला.
अर्शद नदीमचा जन्म 2 जानेवारी 1997 रोजी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एका छोट्या गावात झाला आहे. त्याचं गाव लाहौर शहरापासून जवळपास 300 किलोमीटर दूर आहे. तो सात भावंडांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचे वडील मजूरी करायचे. क्रिकेट अर्शदचं पहिलं प्रेम होतं. मात्र त्याच्या कुटुंबानं त्याला खेळण्यास विरोध केला. त्यानंतर तो ॲथलेटिक्सकडे वळाला.
अर्शद नदीमची उपलब्धी
2024 पॅरिस ऑलिम्पिक – सुवर्ण पदक
2023 विश्व चॅम्पियनशीप – रौप्य पदक
2022 कॉमनवेल्थ खेळ – सुवर्ण पदक
अर्शद नदीमची प्रतिभा ओळखण्यात कोच फैसल अहमदचं मोठं योगदान आहे. त्यांनी सुरुवातीपासून त्याला ट्रेनिंग दिलं आहे. कॉमनवेल्थ खेळांत अर्शदनं सर्वप्रथम 90 मीटरचा आकडा पार केला होता. सध्या तो 90 मीटर भाला थ्रो करणारा एकमेव दक्षिण आशियाई खेळाडू आहे.
हेही वाचा –
भारताच्या पाच पदकांवर पाकिस्तानचा एक ‘सुवर्ण’ भारी, पदकतालिकेत भारताला मोठा धक्का
“खरचं खूप दु:ख…”, विनेश फोगटच्या अपात्रतेवर नीरज चोप्राची भावनिक प्रतिक्रिया
‘प्रत्येक खेळाडूचा दिवस…’, नीरज चोप्रा ‘सिल्व्हर’ जिंकल्याने दुःखी? पाहा पहिली प्रतिक्रिया आली समोर