कॅनडानं 2024 च्या टी20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत फक्त एकच सामना जिंकला आहे. न्यूयॉर्कमध्ये झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्यांचा पराभव झाला. मात्र या सामन्यात सलामीवीर ॲरॉन जॉन्सन शानदार अर्धशतक झळकावून चर्चेत आला आहे. त्यानं 44 चेंडूत 52 धावांची खेळी केली. या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला कॅनडाच्या या शानदार खेळाडूशी संबंधित 4 रंजक गोष्टी सांगणार आहोत.
(1) जमैकासाठी राखीव खेळाडू होता
जमैकामध्ये जन्मलेला ॲरॉन जॉन्सन लहानपणी आपल्या चुलत भावांसोबत क्रिकेट खेळायचा. क्लब स्तरावरील क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करून त्यानं स्वतःचं नाव कमावलं. यामुळे त्याला जमैकाच्या प्रथम श्रेणी संघातील राखीव खेळाडूंमध्ये स्थान मिळालं होतं. मात्र तो जमैकासाठी कधीही खेळू शकला नाही. कारण त्यावेळी संघात आधीपासूनच अनेक उत्कृष्ट सलामीवीर होते.
(2) 2019 मध्ये कॅनडाला गेला
वेस्ट इंडिजमध्ये मर्यादित संधी मिळाल्यानंतर ॲरॉन जॉन्सननं कॅनडाला जाऊन क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. त्याला केयानो कॉलेजमधून शिष्यवृत्ती मिळाली आणि त्यानंतर साडेतीन वर्षांनी तो कॅनडाचा नागरिक बनला. कॅनडाचं नागरिकत्व मिळवण्यापूर्वी जॉन्सन मिडलसेक्स लीगमध्ये शेफर्ड्स बुश क्रिकेट क्लब आणि कॅनेडियन क्लब क्रिकेटमध्ये ब्रिटिश कोलंबिया संघाकडूनही खेळला आहे.
(3) एकापेक्षा जास्त टी20 आंतरराष्ट्रीय शतक झळकावणारा कॅनडाचा पहिला फलंदाज
कॅनडाचं नागरिकत्व मिळाल्यानंतर ॲरॉन जॉन्सननं 2022 च्या डेझर्ट कपमध्ये बहरीनविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. फक्त दोन सामन्यांनंतर त्यानं ओमानविरुद्ध 69 चेंडूत 9 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीनं नाबाद 109 धावा ठोकल्या. यानंतर 2023 मध्ये त्यानं पनामाविरुद्ध त्याच्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील दुसरं शतक झळकावलं. जॉन्सनने त्या सामन्यात 59 चेंडूत नाबाद 121 धावा केल्या होत्या.
(4) कॅनडाला टी20 विश्वचषकासाठी पात्र ठरविण्यात महत्त्वाची भूमिका
ॲरॉन जॉन्सननं टी20 विश्वचषकाच्या पात्रता फेरीत कॅनडासाठी चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत तो संघाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याच्या कामगिरीच्या जोरावर कॅनडानं प्रथमच टी20 विश्वचषकात स्थान मिळवलं.
महत्त्वाच्या बातम्या –
पावसामुळे नेपाळ-श्रीलंकेची चिंता वाढली, दक्षिण आफ्रिका सुपर 8 मध्ये दाखल
भारत-पाकिस्तान सामन्यात सट्टेबाजांची चांदी! कॅनेडियन रॅपरनं जिंकले कोट्यवधी रुपये
ऑस्ट्रेलियाची सुपर 8 मध्ये धडक! ट्रॅव्हिस हेडचा आयपीएलमधील फॉर्म जारी, पॉवरप्लेमध्ये रचला इतिहास