मनू भाकर हे आज जागतिक नेमबाजीत एक मोठं नाव म्हणून उदयास आलं आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिनं कांस्य पदक जिंकून इतिहास रचला. मनू भाकरनं 10 मीटर एअर पिस्तूल महिला एकेरीत कांस्यपदक जिंकलं आहे. यासह मनू नेमबाजीत पदक जिंकणारी देशातील पहिली महिला ठरली. मनू भाकरच्या या यशामागची संपूर्ण कहाणी या बातमीद्वारे जाणून घ्या.
मनू भाकरनं तिच्या संघर्षाच्या कालखंडाबद्दल बोलताना सांगितलं की, ती भाड्याच्या पिस्तुलनं आपली पहिली राष्ट्रीय स्पर्धा खेळली होती. मनू म्हणाली, “सुरुवातीला माझ्याकडे स्वतःचं पिस्तूल नव्हतं. तेव्हा मी विनीत सरांचं पिस्तूल भाड्यानं घेतलं होतं. ट्रिगर किती खाली असावा हे देखील मला माहित नव्हतं. पकड बनवण्यातही खूप अडचण येत होती.” पण या सर्व अडचणींनंतरही मनूनं हार मानली नाही. ती म्हणाली, “मला माहित होतं की मला शूट करायचं आहं. मी कसं तरी मॅनेज करेल. जर तुमच्यात आवड असेल तर तुम्ही कोणत्याही अडचणीवर मात करू शकता.”
एकेकाळी मनू भाकर हिला पिस्तुल परवान्यासाठी संघर्ष करावा लागला होता. मनूचे वडील रामकिशन भाकर यांनी सांगितलं की, परवाना मिळवण्यासाठी त्यांना दररोज 45 किलोमीटर दूर असलेल्या झज्जरला जावं लागायचं. अधिकाऱ्यांनी त्यांचं ऐकलं नाही. आशियाई युवा क्रीडा स्पर्धा जवळ येत होती आणि मनूला सरावासाठी पिस्तुलची गरज होती. पोलीस व दंडाधिकारी यांनी सहकार्य केलं मात्र तत्कालीन एडीसीनं त्यांचं ऐकलं नाही. यानंतर मनूच्या वडिलांनी हरियाणाच्या शिक्षणमंत्र्यांकडे दाद मागितली आणि सीएमओ आणि क्रीडामंत्र्यांनाही ट्विट केलं. दोन महिन्यांनंतर त्यांच्या मेहनतीला अखेर फळ मिळालं आणि मनूला पिस्तूलाचा परवाना मिळाला.
मनू भाकरनं अनेक मुलाखतींमध्ये तिच्या खेळावरील प्रेमाचा उल्लेख केला आहे. ती बॉक्सिंग आणि किक बॉक्सिंगही खेळायची. शूटिंगपूर्वी मनू भाकरनं क्रिकेटचंही प्रशिक्षण घेतलं आहे. ती वीरेंद्र सेहवागच्या झज्जर क्रिकेट अकादमीमध्ये क्रिकेट खेळली आहे. पण शाळेत शूटिंग रेंज तयार झाल्यानंतर ती नेमबाजीकडे वळाली.
हेही वाचा –
शाब्बास मनू! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं जिंकलं पहिलं मेडल; नेमबाजीत कांस्य पदकावर निशाणा
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकाची आशा वाढली! रमिता जिंदाल फायनलमध्ये दाखल
पंतप्रधान मोदींनी खेळाडूंना दिले प्रोत्साहन, ‘मन की बात’मध्ये पॅरिस ऑलिम्पिकचा उल्लेख