दुलीप ट्रॉफीमध्ये सध्या इंडिया ए विरुद्ध इंडिया डी सामना खेळला जातोय. इंडिया ए नं पहिल्या डावात 290 धावा केल्या. प्रत्युत्तरात, इंडिया डी संघ पहिल्या डावात 183 धावांवर गारद झाला. इंडिया ए साठी दुसऱ्या डावात सलामीवीर प्रथम सिंहनं शानदार शतकी खेळी केली. हे त्याचं दुलीप ट्रॉफीतील पहिलं शतक आहे.
प्रथम सिंह या सामन्यात सलामीला उतरला. त्यानं सुरुवातील भरपूर चेंडू खेळले. मात्र त्यानंतर त्यानं लय प्राप्त केली. प्रथम सिंहनं 149 चेंडूत आपलं पहिलं शतक पूर्ण केलं. आपल्या या खेळीत त्यानं 11 चौकार आणि 1 षटकार लगावला. तो 189 चेंडूत 122 धावा करून बाद झाला. इंडिया डी चा कर्णधार श्रेयस अय्यरनं त्याची विकेट घेतली.
31 वर्षीय प्रथम सिंहचा जन्म 31 ऑगस्ट 1992 रोजी दिल्ली येथे झाला. तो रेल्वेसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळतो. काही वर्षांपूर्वी तो आयपीएलमध्ये गुजरात लॉयन्स संघाचा सदस्य होता. तेव्हा सुरेश रैना या संघाचा कर्णधार होता. 2022 च्या मेगा लिलावात प्रथम सिंह कोलकाता नाईट रायडर्समध्ये शामिल झाला. केकेआरनं त्याला 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केलं होतं. आश्चर्याचं म्हणजे, प्रथम सिंहला गुजरात लायन्स आणि केकेआरकडून एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
प्रथम सिंहच्या प्रथम श्रेणी करिअरबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं 29 सामने खेळले, ज्यात त्यानं 25.63 च्या सरासरीनं 1568 धावा ठोकल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय लिस्ट ए मध्ये त्याच्या नावे 40.62 च्या सरासरीनं 1097 धावा आहेत. यामध्ये त्यानं 2 शतकं आणि 8 अर्धशतकं ठोकली आहेत. टी20 क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं 41 सामन्यात 29.78 च्या सरासरीनं 1132 धावा ठोकल्या. यात 8 अर्धशतकांचा समावेश आहे.
हेही वाचा –
“श्रेयस अय्यर स्वतःला कोहली समजतोय, त्याची पातळी…”, माजी क्रिकेटपटूनं वाभाडे काढले
टीम इंडियाचा ‘मिस्टर 360’ आता 34 वर्षांचा, वाढदिवसादिनी जाणून घ्या खास रेकाॅर्ड्स
ना धोनी, ना राहुल द्रविड; युवराज सिंगने या धाडसी फलंदाजाला आवडता कर्णधार म्हणून निवडले