गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर भारताचा पुढील गोलंदाजी प्रशिक्षक कोण कोणार, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला होता. याचं उत्तर आता मिळालं आहे. बीसीसीआयनं भारताच्या श्रीलंका दौऱ्यासाठी साईराज बहुतुले यांची हंगामी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
साईराज बहुतुले यांनी याआधी भारत ‘अ’ संघासाठी गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका बजावली आहे. याशिवाय ते राजस्थान रॉयल्सचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकही होते. बहुतेक चाहत्यांनी टीम इंडियाच्या या माजी गोलंदाजाचं नाव ऐकलं नसेल. या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला साईराज बहुतुले यांच्याबद्दल माहिती सांगणार आहोत.
साईराज बहुतुले यांचा जन्म 6 जानेवारी 1973 रोजी मुंबईत झाला. 1997-98 मध्ये झालेल्या इराणी चषक स्पर्धेत 13 विकेट घेतल्यानंतर बहुतुले प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यानंतर त्यांची राष्ट्रीय संघात निवड झाली. बहुतुले यांनी 1997 मध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यावेळी सचिन तेंडुलकर टीम इंडियाचा कर्णधार होता. तर, 2001 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांचं कसोटी पदार्पण झालं. अनिल कुंबळेला दुखापत झाल्यानंतर बहुतुलेचा संघात समावेश करण्यात आला होता.
बहुतुले यांनी भारतासाठी 2 कसोटी आणि 8 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांना कसोटीत केवळ 3 बळी घेता आले आणि एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्यांची कामगिरी फारशी खास नव्हती. बहुतुले 2003 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळले. त्यानंतर त्यांना संघात पुन्हा स्थान मिळालं नाही.
या माजी डावखुऱ्या गोलंदाजानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व केलं आहे. यानंतर काही कारणांमुळे ते महाराष्ट्राच्या संघात सामील झाले. बहुतुले यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 188 सामने खेळले, ज्यात त्यांनी 26 च्या सरासरीनं 630 विकेट घेतल्या. या दरम्यान त्यांनी 4 वेळा 10 विकेट्स आणि 27 वेळा 5 विकेट्स घेतल्या. याशिवाय फलंदाजीत त्यांनी 31.83 च्या सरासरीनं 6176 धावा केल्या, ज्यात 9 शतकं आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे.
बहुतुले यांनी 143 लिस्ट ए सामन्यांमध्ये 1367 धावा केल्या, तर 197 विकेट घेतल्या. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 12 टी20 सामनेही खेळले, ज्यामध्ये त्यांच्या नावे 10 विकेट आणि 106 धावा आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
मोर्ने मोर्केल नाही! श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाला मिळाले नवे गोलंदाजी प्रशिक्षक
फक्त 2 फलंदाज हे करू शकले, आता बारी विराटची! 152 धावा करताच बनेल मोठा रेकॉर्ड
गुरुपौर्णिमेच्या दिवशी सचिननं काढली आचरेकर सरांची आठवण, सोशल मीडियावर केली खास पोस्ट शेअर