टी20 विश्वचषकाच्या 11व्या सामन्यात अमेरिकेनं गतवेळच्या उपविजेत्या पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये पराभूत करून इतिहास रचला आहे. हा सामना टेक्सासमधील ग्रँड प्रेरी स्टेडियमवर खेळला गेला.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं 20 षटकांत 7 गडी गमावून १५९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, अमेरिकेनंही 20 षटकांत 3 गडी गमावून 159 धावा केल्या. अशा प्रकारे सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला. सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या अमेरिकेनं 18 धावा केल्या. प्रत्युत्तरात, पाकिस्तानचा संघ 6 चेंडूत केवळ 13 धावाच करू शकला.
अमेरिकेसाठी सुपर ओव्हरमध्ये मूळचा महाराष्ट्राचा असलेला सौरभ नेत्रावळकर गोलंदाजीसाठी आला. त्यानं पाकिस्तानला केवळ 13 धावा करू दिल्या आणि एक विकेटही घेतली. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजनं सुपर ओव्हरपूर्वी 4 षटकांच्या कोट्यातही चांगली गोलंदाजी केली होती. त्यानं 4 षटकात केवळ 18 धावा देत मोहम्मद रिझवान आणि इफ्तिखार अहमदची विकेट घेतली. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सौरभ भारताकडून अंडर-19 विश्वचषक खेळला आहे! मात्र चांगल्या संधींसाठी तो अमेरिकेत गेला. जाणून घेऊया त्याची कहाणी…
डावखुरा मध्यमगती गोलंदाज सौरभ नेत्रावळकरचा जन्म 1991 मध्ये मुंबईत झाला. 2008-09 कूचबिहार ट्रॉफीमध्ये त्यानं 6 सामन्यांत 30 बळी घेतले होते. त्यानंतर 2010 च्या अंडर-19 विश्वचषकासाठी त्याची भारतीय संघात निवड झाली. विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील त्रिकोणी मालिकेत तो सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता.
यानंतर, न्यूझीलंडमध्ये झालेल्या 2010 अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत सौरभ केएल राहुल, जयदेव उनाडकट आणि मयंक अग्रवाल यांच्यासह टीम इंडियाचा भाग होता. मात्र, त्या अंडर-19 विश्वचषकात भारतीय संघ प्लेऑफ फेरीतून बाहेर पडला. 2010 च्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत सौरभनं 6 सामन्यांत 9 विकेट्स घेतल्या होत्या. त्याच वेळी, त्याचा इकॉनॉमी रेट 3.11 होता. सौरभशिवाय स्पर्धेतील इतर तीन खेळाडूंनी सिनियर टीम इंडियामध्ये स्थान मिळवलं, पण सौरभला मुकावं लागलं. यानंतर त्यानं रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीसह इतर भारतीय देशांतर्गत स्पर्धांमध्येही भाग घेतला. तथापि, चांगल्या संधीसाठी तो अमेरिकेत गेला आणि तेव्हापासून तो अमेरिकेचं प्रतिनिधित्व करत आहे. तो अमेरिकन संघाचा कर्णधारही राहिला आहे.
सौरभनं 22 डिसेंबर 2013 रोजी मुंबईसाठी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केलं. तर 27 फेब्रुवारी 2014 रोजी त्यानं लिस्ट-ए क्रिकेटमध्ये मुंबईसाठी पदार्पण केलं. त्यानंतर तो मुंबईसोबत विजय हजारे ट्रॉफीमध्येही खेळला. सौरभ हा व्यवसायानं सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. त्यानं मुंबईतील विद्यापीठातून शिक्षण घेतलं असून तो सध्या ‘ओरॅकल’ या सॉफ्टवेअर कंपनीत कार्यरत आहे.
The LinkedIn Profile of SAURABH NETRAVALKAR 🥶 pic.twitter.com/qBn5HajI30
— Johns. (@CricCrazyJohns) June 6, 2024
जानेवारी 2018 मध्ये सौरभनं अमेरिकन संघात स्थान मिळवलं. त्यानंतर तो अमेरिकेसोबत 2018-19 आयसीसी वर्ल्ड टी20 क्वालिफायर स्पर्धेत खेळला. ऑक्टोबर 2018 मध्ये सौरभ अमेरिकन संघाचा कर्णधार बनला होता. 2019 मध्ये त्यानं आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथमच यूएस संघाचं नेतृत्व केले. सौरभच्या नावावर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अमेरिकेकडून सर्वप्रथम पाच विकेट घेण्याचा विक्रमही आहे.
सौरभच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं आतापर्यंत अमेरिकेसाठी 48 एकदिवसीय आणि 29 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 78 आणि टी-20मध्ये 29 विकेट्स आहेत. एकदिवसीयमध्ये त्याची सर्वोत्कृष्ट गोलंदाजी 32 धावांत पाच विकेट आहे, तर टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 12 धावांत पाच विकेट ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. त्याच्या नावावर एक प्रथम श्रेणी सामना आहे, ज्यामध्ये त्यानं तीन विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्यानं 80 लिस्ट-ए सामन्यांमध्ये 117 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
पाकिस्तानची नाचक्की! सुपर ओव्हरमध्ये महाराष्ट्राच्या पोराकडून चारीमुंड्या चीत, इतिहासातील सर्वात वाईट पराभव
रोहित समोर गेल, धोनीही फेल ‘हिटमॅनने’ गाठला 600 षटकारांचा आकडा!
बाबर आझम एमएस धोनी नाही! पाकिस्तानच्या अहमद शहजादनं दिलं तिखट उत्तर