कोलकाता नाईट रायडर्स संघाचा (केकेआर) युवा क्रिकेटपटू वेंकटेश अय्यर याला आयपीएलमधील प्रतिभाशाली युवा क्रिकेटपटूंमध्ये गणले जाते. आयपीएल २०२१ मधील आपल्या अष्टपैलू प्रदर्शनाने अय्यर प्रकाशझोतात आला. त्याच्या याच प्रदर्शनाच्या जोरावर त्याने भारतीय संघातही जागा मिळवली आहे. नुकतेच त्याने न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात सुरू असलेल्या टी२० मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंग यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी याच अय्यरमधील प्रतिभेला हेरले होते. स्वत: पाँटिग यांनी यासंदर्भात उलगडा केला आहे.
पाँटिंग यांना आधुनिक क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट कर्णधारांमध्ये गणले जाते. याचबरोबर त्यांना युवा क्रिकेटपटूंमधील प्रतिभेचा शोध घेणेही चांगलेच जमते. अय्यरने केकेआरसाठी त्याचा पहिला सामनाही खेळता नव्हता, अशावेळीच पाँटिग यांना त्याच्यामधील प्रतिभेचा अंदाज आला होता. अय्यरसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा आठवण करत, केकेआरचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्यूलम यांना आपण त्याच्याविषयी विचारले असल्याचे पाँटिग यांनी सांगितले आहे.
‘द ग्रेड क्रिकेटर’ पॉडकास्टसोबत बोलताना पाँटिग म्हणाले की, “अय्यरने आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात केकेआरसाठी सलामीला फलंदाजी केली. ही त्याची खरी प्रतिभा आहे. त्याला पहिल्या टप्प्यात खेळायची संधी मिळाली नव्हती. त्याने केवळ काही षटके गोलंदाजी केली होती. तो एक अष्टपैलू क्रिकेटपटू आहे. खरे तर मी पहिल्या टप्प्यातच केकेआरचे प्रशिक्षक मॅक्यूलम यांना अय्यरविषयी बोललो होतो.”
“एके दिवशी मी त्याला दिल्ली कॅपिटल्स संघासोबत नेट्समध्ये फलंदाजी करताना पाहिले होते. त्यावेळी मी मॅक्यूलमला म्हणालो होतो की, हा मुलगा कोण आहे? तो केकेआरकडून खेळताना दिसला नाही? यावर मॅक्यूलम म्हणाले होते की, नाही, अजून त्याला संघात घेतले गेलेले नाही,” असेही पाँटिंग यांनी म्हटले.
पुढे आपले वक्तव्य सुरू ठेवत दिल्ली कॅपिटल्सचे प्रसिक्षक पाँटिग म्हणाले की, “मात्र आयपीएलमधील ब्रेकनंतर केकेआरचा संघ वेगळ्याच रणनितीसह मैदानावर उतरला होता. त्यांनी उर्वरित हंगामात कशाप्रकारचे क्रिकेट खेळायचे याची पूर्ण योजना आखली होती. केकेआरला पुढे घेऊन जाण्यात मॅक्यूलम यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यांनी आपल्या पद्धतीने संघाला खेळवले. याचमुळे ही मुले उच्च स्तरावर पोहोचू शकली आणि त्यांनी खूप चांगले क्रिकेट खेळले.”
वेंकटेश अय्यरने आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध पहिला आयपीएल सामना खेळला होता. त्यानंतर पुढील सर्व सामन्यात त्याला अंतिम एकादशमध्ये संधी मिळाली. त्याने आयपीएल २०२१ मध्ये १० सामने खेळताना ४१ च्या सरासरीने ३७० धावा चोपल्या. तसेच गोलंदाजी करताना ३ विकेट्सही घेतल्या. त्याच्या योगदानामुळे केकेआरने अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास केला. परंतु चेन्नई सुपर किंग्जने अंतिम सामन्यात बाजी मारल्याने केकेआरला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘एबी’ची सर्वप्रकाराच्या क्रिकेटमधून निवृत्ती, विराट म्हणाला ‘आय लव्ह यू’; पण तुटलेल्या हृदयासह
भज्जीचा नवा लूक! यष्टीरक्षण करताना अप्रतिम झेल घेताच हरभजनने केला भांगडा, व्हिडिओ व्हायरल