-शंतनू कुलकर्णी
२०१९ च्या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात न्युझीलंडच्या मार्टिन गुप्टिलने थेट फेकीवर धोनीला धावबाद करत भारताच्या विश्वचषक विजेतेपद पटकावण्याच्या आशेवर पाणी फेरले होती. न्युझीलंडविरुद्धचा हाच उपांत्य सामना धोनीचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला कारण तो वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश व न्युझिलंडविरुद्धच्या मालिकेचा भाग नव्हता. त्यामुळे धोनी निवृत्ती घेईल अशीच चर्चा सुरु होती आणि आता काल धोनीने निवृत्ती घेत सर्व चर्चांना पुर्णविराम दिला आहे.
महत्त्चाचे म्हणजे १० जूलै २०१९ रोजी न्युझिलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यांत भारताचा पराभव झाला होता तीच वेळ म्हणजे १९ वाजून २९ मिनीटं माहीने आपली निवृत्ती जाहीर करण्यासाठी निवडली होती. आधी वाटत होते की धोनी ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वचषक स्पर्धो खेळुन निवत्ती घेईल पण कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे धोनीने आता निवृत्तीचा निर्णय घेतला असावा. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीमुळे त्याच्या जागी कोण ही चर्चा तर होणारच कारण २०२१ मध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धा होत आहे.
रिषभ पंत- आयपीएल व देशांतर्गत स्पर्धांतील कामगिरीच्या बळावर रिषभने भारतीय संघात प्रवेश मिळवला आणि मागिल २-३ वर्षांपासून तो भारतीय संघाचा भाग आहे. पण एक-दोन खेळी सोडल्यास तो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सपशेल अपयशी ठरला आहे. त्यामुळे रिषभला जर आपले संघातील स्थान कायम ठेवायचे असेल तर यष्टिरक्षणा बरोबरच फलंदाजीमध्ये सुद्धा त्याला कामगिरी उंचवावी लागेल. युएईमध्ये होणाऱ्या आयपीएलच्या १३ व्या पर्वात शानदार कामगिरी करुन तो आत्मविश्वास परत मिळवु शकतो.
के एल राहुल– मागील ४-५ वर्षांपासुन राहुल क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. कधी सलामीवीर म्हणुन, कधी चौथ्या तर कधी पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करत राहुलने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. २०१९ च्या विश्वचषकानंतर कर्णधार कोहलीने राहुलवर मोठी जबाबदारी दिली ती म्हणजे टी-२० व एकदिवसीय सामन्यांत यष्टिरक्षणाची आणि राहुलने ही ती चांगल्या प्रकारे पेलली आहे. जेव्हा पासुन राहुलला फलंदाजीसोबत यष्टिरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे तेव्हा पासुन त्याची फलंदाजी आणखीन खुलली आहे. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन त्याच्यावर पुर्णवेळ यष्टिरक्षणाची जबाबदारी सोपवतात का हे पाहावे लागेल.
इशान किशन– २०१६ च्या १९ वर्षाखालील भारतीय संघाचा कर्णधार राहिलेल्या इशानला अजुनही भारतीय संघात खेळण्याची संधी मिळालेली नाही. पण देशांतर्गत व आयपीएलमध्ये जबरदस्त फटकेबाजी करत त्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात त्याला भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळू शकते. त्यासाठी त्याला आपल्या कामगिरीत सातत्य राखावे लागेल हे मात्र नक्की.
संजु सॅमसन– कुलदिप यादव, श्रेयस अय्यर यांसोबत सॅमसन १९ वर्षाखालील विश्वचषकाचा भाग होता. विश्वचषक गाजवल्यानंतर सॅमसनने देशांतर्गत स्पर्धेत केरळसाठी तर आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स व दिल्ली कॅपिटल्स (दिल्ली डेअरडेविल्स) साठी अनेक शानदार खेळी केल्या. त्यानंतर आलेल्या रिषभ पंतला त्याच्या आधी भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली. सॅमसनला ज्या काही हातावर मोजण्या इतक्या संधी मिळाल्या त्यात तो काही मोठी खेळी खेळू शकला नाही. त्यामुळे त्याला पुन्हा भारतीय संघात परतायचे असेल तर त्याला देशांतर्गत स्पर्धेत आपल्या कामगिरीत सातत्य राखावे लागेल.
एमएस धोनीच्या आधी पदार्पण केलेले पार्थिव पटेल व दिनेश कार्तिक अजुनही खेळत आहेत परंतू या दोघांना भारतीय संघात पुन्हा संधी मिळेल असे दिसत नाही. त्यामुळे सद्यस्थितीत रिषभ पंत, के एल राहुल, इशान किशन व संजु सॅमसन यांच्यापैकी कोणा एकाला संधी मिळू शकते.