प्रो कबड्डीच्या यंदाच्या मोसमात रेडर्सचा बोलबाला आहे. काही संघ फक्त रेडींगच्या जोरावर एकतर्फी सामने संघासाठी जिंकून देत आहेत. याला अपवाद फक्त हरयाणा स्टीलर्स आणि गुजरात फॉरचून जायन्ट्स ठरत आहेत. अनुभवी डिफेंडर्स प्रत्येक संघात नाहीत याचा देखील फायदा विरोधी संघातील रेडर्सला मिळतो आहे. त्यामुळे रेडर्स या मोसमात खूप गुण मिळवताना आपण पहिले आहेत.
या मोसमात खरी चुरस आहे ती ‘खिलाडी कुमार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित कुमार, ‘प्रो कबड्डीचा पोस्टर बॉय राहुल चौधरी’ आणि ‘डुबकी किंग प्रदीप नरवाल’. या तिघांपैकी कोण या मोसमात अगोदर १०० गुणांचा पल्ला गाठणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
या मोसमाच्या यशस्वी रेडर्सच्या यादीत सध्या रोहित कुमार ९० गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. रोहितने खेळलेल्या १० सामन्यात खेळताना ९० गुण मिळवले आहेत. त्यातील ८२ गुण त्याने रेडींगमध्ये मिळवले आहेत तर बाकीचे ८ गुण त्याने डिफेन्समध्ये मिळवले आहेत. त्याने या १० सामन्यात ५ वेळा सुपर टेन कमावला आहे. संघातील बाकीच्या खेळाडूंकडून मिळणाऱ्या सहकार्याच्या अभावामुळे तो बेंगलूरु बुल्सला फक्त तीन विजय मिळवून देऊ शकला आहे. सहा सामने या संघाने गमावले आहेत तर एक सामना या संघाने बरोबरीत सोडवला आहे.
राहुल चौधरी या मोसमात यशस्वी रेडर्सच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. राहुलने ११ सामने खेळताना ८७ गुण मिळवले आहेत. त्यातील ८३ गुण त्याने रेडींगमध्ये मिळवले आहेत तर बाकी ४ गुण त्याने डिफेन्समध्ये मिळवले आहेत. राहुलने ११ सामन्यात ४ वेळा सुपर टेन मिळवला आहे. त्याला संघातील अन्य खेळाडूने उत्तम साथ न दिल्याने तेलुगू टायटन्स ११ सामन्यात फक्त २ विजय मिळवू शकला आहे. या मोसमात राहुलने २०१ रेड केल्या आहेत. या मोसमात २०० रेड्सचा पल्ला गाठणारा राहुल एकमेव खेळाडू आहे.
प्रदीप नरवाल या मोसमात यशस्वी रेडर्सच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने खेळलेल्या ७ सामन्यात त्याने ८३ गुण मिळवले आहेत. विशेष बाब म्हणजे हे सारे गुण त्याने रेडींगमध्ये कमावले आहेत. त्याने ७ सामन्यात ४ वेळा सुपर टेन मिळवला आहे. त्याचा या कामगिरीच्या जोरावर पटणा पायरेट्सने ७ सामन्यात ४ सामने जिंकले आहेत. एक सामना त्यांनी गमावला आहे तर दोन सामने या संघाने बरोबरीत सोडवले आहेत.
या मोसमात १०० गुण मिळवणारा पहिला खेळाडू होण्याची सर्वाधिक संधी रोहित कुमारला होती पण कालचा त्याच्या संघाचा यु पी विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. राहुल चौधरी याचा पुढचा सामना ३१ ऑगस्टला तमील थालयइवाज विरुद्ध असणार आहे. त्यात जर त्याने १३ गुण मिळवले तो १०० गुणांचा टप्पा गाठू शकतो.