गौतम गंभीर भारतीय संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर आता तो संघात काय बदल करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. गंभीर आयपीएलमध्ये केकेआरचा कर्णधार असताना त्यानं अनेक धक्कादायक निर्णय घेतले होते. याचा संघाला फायदाही झाला. त्यानंतर मेंटॉर म्हणून केकेआरमध्ये परतल्यानंतर त्यानं संघात अनेक बदल केले. आता तो भारतीय संघात देखील असेच बदल करतो का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.
सध्याच्या क्षणाला गंभीरपुढील सर्वात मोठी समस्या म्हणजे भारतीय टी20 संघाचा नवा कर्णधार शोधणं. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं टी20 विश्वचषक जिंकला आणि त्यानंतर हिटमॅननं टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यामुळे आता त्याच्या जागी संघाचा कर्णधार कोण बनतो, याचा निर्णय गंभीरला घ्यावा लागणार आहे.
टी20 विश्वचषकात हार्दिक पांड्या भारतीय संघाचा उपकर्णधार होता. त्यामुळे रोहितनंतर तोच कर्णधार बनेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. हार्दिक पांड्यासाठी जमेची बाजू म्हणजे, तो खूप अनुभवी खेळाडू असून कर्णधार म्हणूनही त्याचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. हार्दिक पांड्यानं 2022 मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सला आयपीएल चॅम्पियन बनवलं होतं. त्यानंतर 2023 मध्ये संघ फायनलपर्यंत पोहचला होता, जेथे त्यांना चेन्नईविरुद्ध शेवटच्या चेंडूवर पराभव पत्कारावा लागला होता.
हार्दिक पांड्या सध्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. जरीही त्याला आयपीएल 2024 मध्ये मुंबईचा कर्णधार म्हणून काही छाप पाडता आली नाही. मुंबईनं आयपीएल 2024 मध्ये हार्दिकच्या नेतृत्वाखाली 14 पैकी केवळ 4 सामन्यांत विजय मिळवला आणि संघ गुणतालिकेत तळाशी राहिला होता. मात्र हार्दिकच्या क्षमता सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे सध्या तरी रोहित शर्माचा उत्तराधिकारी म्हणून तोच सर्वोत्तम पर्याय आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
गौतम गंभीर हेड कोच बनला, आता ‘या’ 3 खेळाडूंना संघात पुन्हा स्थान मिळण्याची शक्यता नाही
केकी तारापोरपासून गौतम गंभीरपर्यंत, 25 मुख्य प्रशिक्षकांनी सांभाळली टीम इंडियाची जबाबदारी; वाचा संपूर्ण यादी
टीम इंडियाचा हेड कोच झाल्यानंतरही गाैतम गंभीर ‘केकेआर’चा मेंटाॅर राहणार का? पाहा बीसीसीआयचा नियम