मुंबई | आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आज, 20 जूनला पुरुषांच्या क्रिकेटमधील 2018-2023 या दरम्यानचा भविष्यातील कार्यक्रम घोषित केला आहे.
यात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांच्या सामन्यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचे मुख्य लक्ष द्विपक्षिय क्रिकेटकडे असणार आहे.
यामध्ये कसोटी चॅम्पियनशिप आणि वनडे लीगच्या वेळापत्रकाचीही माहिती दिली आहे.
पहिल्या कसोटी चॅम्पियनशिपमध्ये क्रमवारीतील पहिले 9 संघ सहभागी होतील. ही स्पर्धा 15 जुलै 2019 ते 30 एप्रिल 2021 दरम्यान होणार आहे. या 2 वर्षांच्या कालावधी दरम्यान प्रत्येक संघ 6 मालिका खेळेल. यात मायदेशात आणि परदेशात होणाऱ्या मालिकांचा समावेश आहे.
त्यानंतर अव्वल दोन संघ जून 2021 मध्ये अंतिम फेरी खेळतील. यात जो संघ विजयी ठरेल कसोटी चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवेल.
कसोटी चॅम्पियनशिपची फायनल कोणत्या देशात होणार याबद्दल मात्र वाद आहेत. अनेक देशांच्या म्हणण्यानुसार ही फायनल इंग्लंडमध्ये व्हावी. यात आयसीसी देखील हा सामना इंग्लंडमध्ये व्हावा म्हणुन प्रयत्नशील आहे.
अनेक देशांच्या मते जून महिन्यात इंग्लंडमध्ये उन्हाळा असतो. तसेच कसोटी खेळणाऱ्या देशांमधील वेळ लक्षात घेता सर्वच देश जर इंग्लंडमध्ये अंतिम सामना झाला तर टेलिव्हीजनच्या माध्यमातून स्पर्धेचा आनंद घेऊ शकतात.
न्युझीलंड क्रिकेट बोर्डाने तर दिलेल्या प्रसिद्धी पत्रात इंग्लंडच याचे आयोजक असल्याचे लिहीले होते. परंतु याला बीसीसीआयचा विरोध आहे.
जून २०२१मध्ये जरी फायनल होत असली तरी मार्च २०२१मध्ये गुणतालिकेत कोण अव्वल राहतो हे ठरणार आहे. याचमुळे बीसीसीआयचे स्पष्ट म्हणणे आहे की जो देश या गुणतालिकेत अव्वल स्थानी राहिल त्यांना हा यजमानपदाचा मान मिळावा.
प्रक्षेपणाबद्दलही वाद-
कसोटी क्रिकेटमध्ये जो देश यजमान असतो त्याकडे प्रक्षेपणाचे अधिकार असतात. असे असताना आयसीसीच्या अन्य मोठ्या स्पर्धोंप्रमाणे फायनल ही आयसीसीची स्पर्धा ठरणार आहे. त्यामुळे या फायनलचा सर्व खर्च, मार्केटींग आणि आयोजन आयसीसीच्या माध्यमातून होणार आहे.
त्यामुळे यजमान देश कोणताही असला तरी याचे प्रक्षेपणाचे अधिकार हे आयसीसीला आहे. त्यामुळे हे नक्की कोणाला मिळतात हे पहाण औत्सुक्याचे ठरणार आहे.
आयसीसीच्या अधिकृत ब्राॅडकास्टर असलेले स्टार हे भारतात जर सामना होणार असेल तर १० मिलियन डाॅलर तसेच भारताबाहेर ५ मिलियन डाॅलर द्यायला तयार आहे.
असा असेल भविष्यातील कार्यक्रम (2018-2023)
– कसोटी चॅम्पियनशिप
– सायकल 1 – 2019-2021(फायनल जून 2021)
– सायकल 1 – 2021-2023(अंतिम फेरी 2023)