भारतीय क्रिकेटची पहिली ओळख असलेल्या महाराजा रणजीत सिंहजी यांच्या स्मरणार्थ खेळल्या जाणाऱ्या रणजी ट्रॉफीचा ८७ वा सिझन अखेरीकडे चालला आहे. देशातील सर्वोच्च फर्स्ट क्लास टूर्नामेंट असलेली रणजी ट्रॉफी दोन वर्षानंतर खेळली गेली. कोरोनामूळे इतिहासात प्रथमच ही स्पर्धा रद्द करावी लागलेली. मात्र, २०२२ मध्ये पुन्हा रणजी ट्रॉफीने आपली तीच ‘परंपरा प्रतिष्ठा आणि अनुशासन’ जपत भारतीय क्रिकेटला समृद्ध केले. अनेक नवे खेळाडू सर्वांच्या दृष्टिक्षेपात आले. जुने रेकॉर्ड मोडले गेले नवे रेकॉर्ड बनले. पहिल्यांदाच दोन टप्प्यात आयोजित केल्या गेलेल्या रणजी ट्रॉफी सिझनच्या सेमीफायनल मंगळवारपासून म्हणजेच १४ जूनपासून बेंगलोर येथे खेळल्या जातायत.
ती प्रतिष्ठेची रणजी ट्रॉफी उंचावण्यासाठी मुंबई, बंगाल, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या टीम जिवाच रान करतील. कारण, प्रत्येक टीमला देशातील या सर्वोच्च क्रिकेट स्पर्धेचे विजेते म्हणून घ्यायला नक्कीच आवडेल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच ‘सेमी फायनलिस्ट’ संघांसमोरील आव्हाने आणि रणजी ट्रॉफी जिंकण्याची त्यांना किती संधी आहे? याबाबत जाणून घेणार आहोत.
रणजी ट्रॉफी २०२२ जिंकण्यासाठी सर्वात जास्त मेहनत कोणता संघ घेत असेल, आणि त्यांना त्या ट्रॉफीची सर्वात जास्त गरज असेल तो संघ म्हणजे मुंबई. आजवर झालेल्या ८६ रणजी ट्रॉफीपैकी ४६ फायनल खेळलेला आणि ४१ वेळा रणजी ट्रॉफी उंचावलेला मुंबई एकमेव संघ आहे. पहिल्या सीजनपासून मुंबईचे या स्पर्धेवर वर्चस्व राहिले आहे. मात्र, २०१६ नंतर मुंबईकर या ट्रॉफीवर आपला हक्क सांगू शकले नाहीत. आपली तीच प्रतिष्ठा पुन्हा एकदा मिळवण्यासाठी मुंबई आटोकाट प्रयत्न करेल. उत्तर प्रदेशला पराभूत करून चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या सीझनच्या फायनलमध्ये खेळणे मुंबईचे पहिले टार्गेट असणार आहे. क्वार्टर फायनलमध्ये उत्तराखंडला ७२५ रन्सच्या अंतराने मात देणाऱ्या मुंबईकडे, त्या वर्ल्ड रेकॉर्डचा कॉन्फिडन्स नक्कीच असेल. कॅप्टन पृथ्वी शॉ, यशस्वी जयस्वाल, क्वार्टर फायनलमध्ये डेब्यू केलेला डबल सेंचुरीयन सुवेद पारकर, ‘ब्रॅडमन टच’मध्ये खेळत असलेला सर्फराज खान, ऑलराऊंडर शम्स मुलानी आणि धवल कुलकर्णी यांच्यामुळे मुंबईचे ४२ व्या रणजी ट्रॉफीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
हेही पाहा- रणजीच्या रणात कोण असणार फायनलचे दावेदार?
रणजी जायंट मुंबईविरूद्ध ज्यांना सेमी फायनलमध्ये दोन हात करायचे आहेत त्या उत्तर प्रदेशसाठी ही एक नवी सुरुवात असेल. कारण, मागच्या काही काळात ज्यांनी डोमेस्टिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे, त्या कर्नाटकला पराभूत करून ते सेमी फायनलमध्ये पोहचलेत. देशाला आजवर अनेक इंटरनॅशनल क्रिकेटर देणाऱ्या उत्तर प्रदेशने फक्त एकदाच रणजी ट्रॉफी आपल्या नावे केलीये. ते वर्ष होते २००६. मधल्या काळात सुरेश रैना, प्रवीण कुमार, आरपी सिंग, पियुष चावला, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव असे उत्तर प्रदेशातून आलेले क्रिकेटर भारतासाठी खेळले. पण, रणजी ट्रॉफी काही त्यांच्यापर्यंत आली नाही. आजचा उत्तर प्रदेशचा संघ पहिला तर, आयपीएल आणि टीम इंडियाच्या आसपास असलेली अनेक नावे त्या संघात दिसतील. स्वतः कर्णधार कुलदीप यादव, प्रियम गर्ग, अंकित राजपूत, यश दयाल, करन शर्मा, रिंकू सिंग, शिवम मावी यांच्यासारखे दमदार युवा खेळाडू मुंबईला पराभूत करण्याचा नक्कीच माद्दा ठेवतात.
अलूर येथे होणाऱ्या पहिल्या सेमी फायनलमध्ये क्वार्टर फायनलला विश्वविक्रमी कामगिरी करणारा बंगालचा संघ मध्य प्रदेशशी दोन हात करेल. बंगालने झारखंडविरुद्ध ड्रॉ झालेल्या मॅचमध्ये पहिल्या इनिंगच्या लीडच्या जोरावर सेमी फायनलमध्ये जागा मिळवली. त्यांच्या तब्बल नऊ बॅटर्सने ५०+ स्कोर पहिल्या इनिंगमध्ये नोंदवलेले. आजवर १२ वेळा रणजी ट्रॉफी फायनल खेळलेल्या बंगालला फक्त दोनदा ती ट्रॉफी जिंकण्यात यश आलय. त्यातही शेवटच्या वेळी त्यांनी ट्रॉफी उंचावलेली ती १९९० मध्ये. म्हणजेच तब्बल तीन दशकांपासून बंगाल रणजी ट्रॉफीविना आहे. आजच्या बंगाल संघाचा विचार केला तर, त्यांचा माजी कर्णधार आणि आता पश्चिम बंगालचा क्रीडामंत्री असलेला मनोज तिवारी इन्स्पिरेशन म्हणून अजूनही संघात खेळतोय. क्वार्टर फायनलला त्याचंही शतक होत. जोडीला कर्णधार अभिमन्यू ईस्वरन, ऋत्विज चॅटर्जी, अनुस्तूप मुजुमदार, शहाबाज अहमद आणि इशान पोरेल अशी आणखी अनुभवी नावे आहेत. त्यामुळे ३२ वर्षांनंतर रणजी ट्रॉफी उंचावण्याचे त्यांचे स्वप्न साकार झाले तरी, आश्चर्य वाटायला नको.
सेमीफायनलपर्यंत पोहोचलेल्या चार टीमपैकी कोणाला सर्वात फ्रेश स्टार्टची गरज असेल तर तो संघ म्हणजे मध्य प्रदेश. कारण, या चारपैकी तो एकमेव असा संघ आहे ज्यांनी अद्याप रणजी ट्रॉफी जिंकलेली नाही. इतिहासात गेलं तर त्यावेळी होळकर संस्थानाच्या नावाने खेळणाऱ्या मध्य प्रदेशातील संघाने वेळा रणजी ट्रॉफी आपल्या नावे केली होती. त्यातलीही शेवटची ट्रॉफी १९५२-१९५३ सीझनला आलेली. म्हणजेच मध्य प्रदेश या नावाने रणजी जिंकायची असेल तर, या संघाला नक्कीच स्पेशल काहीतरी करून दाखवावे लागेल. पंजाबचे आव्हान मोडीत काढत ते इथपर्यंत आलेत. रजत पाटीदार व कर्णधार आदित्य श्रीवास्तव ही दोन नावे वगळली तर संपूर्ण संघ नवखा आहे. मात्र, शुभम शर्मा, हिमांशू मंत्री, पुनीत दाते यांनी संपूर्ण सीजनमध्ये दमदार कामगिरी करत मध्य प्रदेशला इथपर्यंत पोहोचवलेय. सध्या भारतीय संघात असलेले आवेश खान व व्यंकटेश अय्यर संघाशी जोडले गेल्यास मध्य प्रदेशची ताकद आणखीन वाढेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आर्थिक संकटात अडकलेल्या श्रीलंकेला आता फक्च क्रिकेटच वाचवू शकतं, कसं ते वाचा सविस्तर
ज्या दाऊदला पाहून सर्वांची टरकते, त्याला कपिल पाजींनी शिकवलेला चांगलाच धडा, काय होता तो किस्सा?