जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड म्हणून प्रसिद्ध असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी (२४ डिसेंबर) ३ नव्या निवडकर्त्यांची घोषणा केली. बीसीसीआयने चेतन शर्मा यांची मुख्य निवडकर्ता म्हणून निवड केली आहे. तर देवाशिष मोहंती आणि अभय कुरुविला यांचीही निवड समीतीत निवडकर्तापदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू अजित आगरकर यांनी भारताकडून २६ कसोटी व १९१ वनडे सामने खेळले आहेत. त्यामुळे मुख्य निवडकर्ता म्हणून आगरकर यांच्या नावाला पसंती मिळेल, अशी दाट शक्यता होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून सर्वाधिक चर्चेत असलेले आगरकर यांचे नाव अंतिम निवड झालेल्या सदस्यांच्या यादीत नसल्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. यामागे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या राजकारणी डावपेचाचा हात असल्याचे म्हटले जात आहे.
आगरकरांचा पत्ता कशामुळे कटला?
माध्यमांतील वृत्तानुसार, बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने अहमदाबाद येथे पार पडलेल्या वार्षिक बैठकीत आगरकर आणि कुरुविला यांच्याविषयी खूप वेळ विचार केला. दिवसभरातील सल्लामसलतीनंतर निवडकर्ता पदासाठी कुरुविला यांना पसंती देण्यात आली, ज्यांची क्रिकेटमधील उपलब्धता आगरकरांच्या उपलब्धतेपुढे काहीच नाही. अर्ज भरलेल्या सर्व नावांपैकी आगरकर हे एकमेव असे उमेदवार होते, ज्यांच्याकडे २००पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव होता.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, “आगरकर मुंबई क्रिकेट संघाचे समर्थन प्राप्त करू शकले नाहीत. त्यांनी मुंबई संघाचे मुख्य निवडकर्ता म्हणून जास्त सामने पाहिलेले नाहीत, असा त्यांच्यावर आरोप होता. मुंबई क्रिकेट जगतातील प्रभावशाली व्यक्तींचे कुरुविला यांना समर्थन होते. त्यामुळे उत्तम क्रिकेट आकडेवारी असूनदेखील आगरकर कुरुविलावर मात करू शकले नाहीत.”
अर्ज दिलेल्या व्यक्तींची यादी
बीसीसीआयच्या नियमानुसार सर्वात जास्त कसोटी सामने खेळणाऱ्या व्यक्तीलाच निवड समितीचे प्रमुख बनवले जाते. यापूर्वी सुनील जोशी हे निवड समितीचे प्रमुख होते. त्यांनी भारताकडून १५ कसोटी सामने खेळले होते. पण आता चेतन शर्मा निवड समीतीचे प्रमुख असतील कारण त्यांनी २३ कसोटी सामने खेळले आहेत. तर जोशी हे निवड समीती सदस्य असतील.
निवडकर्ता पदासाठी माजी भारतीय खेळाडू अजित आगरकर याच्यासह वेस्ट झोनमधून नयन मोंगिया आणि अभय कुरुविला यांनी देखील अर्ज दिले होते. त्यांच्यासोबतच नॉर्थ झोन मधून चेतन शर्मा, मनिंदर सिंह, विजय दहिया, अजय रात्रा आणि निखिल चोप्रा, तर ईस्ट झोनकडून शिव सुंदर दास, देबाशिष मोहंती आणि राणादेव बोसदेखील या पदाच्या शर्यतीत होते.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! विश्वचषकात पहिली हॅट्रिक घेणारा क्रिकेटपटू बनला भारतीय निवड समीतीचा प्रमुख
अशी ४ कारणे, ज्यामुळे भारतीय संघ जिंकू शकतो बॉक्सिंग डे कसोटी
…आणि सचिनचा कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्याची संधी कूकने दवडली !!!