शनिवारी सकाळी जेव्हा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा बीसीसीआयनं सुमारे एका आठवड्यासाठी पुढे ढकलल्याची बातमी आली, तेव्हा कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत सर्वत्र चर्चा होती की, शनिवार किंवा रविवारपर्यंत संघाची घोषणा केली जाईल. स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्याची अंतिम तारीख 12 जानेवारी आहे. परंतु मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांच्यात झालेल्या दीर्घ चर्चेनंतर बोर्डानं हा निर्णय घेतला.
बीसीसीआयनं जो हा निर्णय घेतला, त्यामागे दोन मोठी कारणे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता भारतीय संघाची घोषणा 18 किंवा 19 जानेवारी रोजी केली जाईल. यानंतरही निवडकर्ते संघात बदल करू शकतात. बीसीसीआयनं संघाची घोषणा एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय का घेतला? त्या दोन प्रमुख कारणांबद्दल या बातमीद्वारे जाणून घेऊया.
ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेतील पराभवानंतर ज्या गोष्टीवर सर्वात जास्त टीका झाली, ती म्हणजे अनुभवी खेळाडूंनी मालिकेपूर्वी सराव केला नाही. ते देशांतर्गत क्रिकेट खेळले नाहीत. अशा परिस्थितीत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी संघाचा चांगला सराव करून घ्यायचा आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार, भारत 13 फेब्रुवारीपर्यंत संघात बदल करू शकतो. त्यापूर्वी भारताला इंग्लंडविरुद्ध वनडे आणि टी20 मालिका खेळायची आहे. या मालिकेतील खेळाडूंची कामगिरी पाहून बीसीसीआय निर्णय घेऊ शकते.
भारतीय संघाची घोषणा करण्यापूर्वी बीसीसीआयला आणखी एक बाब विचारात घ्यायची आहे, ती म्हणजे खेळाडूंची फिटनेस. मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह तसेच कुलदीप यादव यांच्या फिटनेसवर शंका आहे. ते अनुपलब्ध असल्यास त्यांच्याजागी कोणाचा संघात समावेश करायचा, याचा विचार बीसीसीआयला करावा लागेल. संघ निवडीची घोषणा पुढे ढकलण्याचं हे दुसरे मोठं कारण आहे.
हेही वाचा –
सोलापूरच्या अर्शिन कुलकर्णीचं पदार्पणातच शतक! महाराष्ट्राची सेमीफायनलमध्ये धमाकेदार एंट्री
कोहलीचा ‘विराट’ विक्रम धोक्यात! यशस्वी जयस्वाल लवकरच करणार मोठा पराक्रम
“हा खेळाडू सचिन तेंडुलकरपेक्षाही चांगला”, ग्रेग चॅपेल यांनी केली धक्कादायक तुलना