भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमधील गाबा मैदानावर सुरू आहे. एकेकाळी ऑस्ट्रेलियाचा अभेद्य किल्ला मानल्या जाणाऱ्या गाबावर तीन वर्षांपूर्वी म्हणजेच 2021 मध्ये भारतानं ऐतिहासिक विजय नोंदवला होता. तेव्हापासून ऑस्ट्रेलियानं या मैदानावरील आपली मजबूत पकड गमावली. येथे गेल्या चारपैकी दोन सामन्यांत कांगारुंचा पराभव झाला आहे.
बॉर्डर-गावस्कर पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. अशा परिस्थितीत हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा आहे. पर्थमध्ये भारतानं बाजी मारली होती, तर ॲडलेडमध्ये ऑस्ट्रेलियानं वर्चस्व गाजवलं. आता गाबा कसोटीत भारतीय कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो चर्चेचा विषय बनला आहे. यापूर्वी दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली होती. मात्र या कसोटीत गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर रोहित शर्मानं त्यामागची रणनीती स्पष्ट केली.
नाणेफेकीनंतर रोहित म्हणाला, “आम्ही प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला कारण खेळपट्टीवर गवत आहे, ज्यामुळे गोलंदाजांना सुरुवातीला मदत मिळू शकते. याशिवाय खेळपट्टी थोडी मऊ दिसते आणि आकाश ढगाळ आहे. आम्हीला या परिस्थितीचा फायदा घ्यायचा आहे. आम्ही गेल्या सामन्यात काही महत्त्वाच्या संधी गमावल्या होत्या. परंतु यावेळी ड्रेसिंग रूममधील वातावरण खूप चांगले आहे आणि सर्व खेळाडू उत्साहित आहेत.
गाबा कसोटीसाठी भारतानं आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले. रविचंद्रन अश्विनच्या जागी अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाचा संघात समावेश करण्यात आला असून हर्षित राणाच्या जागी युवा वेगवान गोलंदाज आकाश दीपला संधी देण्यात आली आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियासाठी तिसऱ्या कसोटीत स्कॉट बोलँडच्या जागी दुखापतीतून सावरलेल्या जोश हेझलवूडचं पुनरागमन झालंय.
गाबा कसोटीसाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप
ऑस्ट्रेलिया – उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि जोश हेझलवुड
हेही वाचा –
“मला संधी मिळाली तर…”, टीम इंडियातील कमबॅकवर अजिंक्य राहणेचं सूचक वक्तव्य
विनोद कांबळी एकेकाळी विराट-जडेजापेक्षा फिट होता! या एका कारणामुळे बरबाद झालं करिअर
अखेरच्या कसोटी सामन्यात साऊदीचा बॅटनं धुमाकुळ! ख्रिस गेलच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी