रणजी ट्रॉफी 2025-26 (Ranji trophy 2025- 26) च्या दुसऱ्या टप्प्यात मुंबईचा संघ हैदराबादविरुद्ध मैदानात उतरला, पण ‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये यशस्वी जयस्वाल (Yashavi jaiswal) दिसला नाही. सध्या भारतीय संघ टी-20 मालिका खेळत आहे आणि जयस्वाल या संघाचा भाग नाही. त्यामुळे तो मुंबईसाठी रणजी ट्रॉफी खेळताना दिसेल अशी चाहत्यांना आशा होती.
युवा स्टार सलामीवीर यशस्वी जयस्वालला डिसेंबरमध्ये ‘फूड पॉयझनिंग’ झाले होते, ज्यामुळे त्याला काही दिवस रुग्णालयातही दाखल करावे लागले होते. अवघ्या दोन दिवसांत त्याचे दोन किलो वजन कमी झाले होते आणि त्याला गंभीर ‘गॅस्ट्रोएन्टेरिटिस’ (पोटाचा आजार) झाला होता. काही दिवसांनी जयस्वाल घरी परतला, पण तो भारत किंवा मुंबईसाठी सामने खेळू शकला नाही. रिपोर्टनुसार, जयस्वालला पोटाचा त्रास पुन्हा जाणवू लागला आहे. त्याने काही दिवसांपूर्वी तपासणी केली होती आणि त्यासंदर्भात तो लवकरच पुन्हा एकदा डॉक्टरांची भेट घेणार आहे. आरोग्याच्या बाबतीत तो सध्या कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच जयस्वाल पुन्हा मैदानात पुनरागमन करेल.
आजारी पडण्यापूर्वी यशस्वी जयस्वालने रणजी ट्रॉफी 2025-26 मध्ये मुंबईसाठी एक सामना खेळला होता. राजस्थानविरुद्धच्या त्या सामन्यात त्याने पहिल्या डावात 67 आणि दुसऱ्या डावात 156 धावांची दमदार खेळी केली होती. याशिवाय त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 आणि विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्येही सहभाग घेतला होता, जिथे त्याने उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. आता जयस्वाल आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना दिसेल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.






