भारत-ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामन्यात सॅम कॉन्स्टन्सला धक्का मारल्याबद्दल विराट कोहलीला त्याच्या मॅच फीच्या 20 टक्के दंड भरावा लागणार आहे. मेलबर्न कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात ही घटना घडली. डावाच्या 10व्या षटकात कोहलीनं 19 वर्षीय सॅम कॉन्स्टन्सच्या खांद्याला धक्का मारला.
कॉमेंट्री दरम्यान रिकी पाँटिंगनं सांगितलं की, कोहली स्वतः कॉन्स्टन्सच्या दिशेनं चालत आला होता. दरम्यान, अशा कृत्यासाठी कोहलीला केवळ मॅच फीचा दंड का ठोठावण्यात आला. त्याच्यावर एका सामन्याची बंदी का लगावण्यात आली नाही? असा प्रश्न चाहते विचारत आहेत. या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे देतो.
दुसऱ्या खेळाडूशी अयोग्यरित्या शारीरिक संपर्क केला तर तो लेव्हल 2 गुन्हा मानला जातो. लेव्हल 2 च्या गुन्ह्यात, गुन्हेगाराला 2 किंवा 3 डिमेरिट पॉइंट मिळू शकतात. एखाद्या खेळाडूला 24 महिन्यांत 4 डिमेरिट गुण मिळाले असतील तरच त्याच्यावर सामन्याची बंदी लादली जाऊ शकते. असं झाल्यास खेळाडूला एक किंवा अधिक सामन्यांच्या बंदीला सामोरं जावं लागू शकतं. आजच्या गुन्ह्यासाठी कोहलीला फक्त एक डिमेरिट पॉइंट मिळाला आहे.
मेलबर्न कसोटीच्या पहिल्या दिवशी घडलेल्या या घटनेनंतर विराट कोहली आणि मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांच्यात 10 मिनिटे बैठक झाली, ज्यामध्ये कोहलीनं त्याला मिळालेली शिक्षा स्वीकारली. सॅम कॉन्स्टन्सला जाणीवपूर्वक धक्का मारल्यामुळे कोहलीवर एका सामन्याची बंदी घातली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, परंतु सुदैवानं तसं झालं नाही.
आपल्या पदार्पणात सॅम कॉन्स्टन्सनं धमाकेदार खेळी केली. त्याचा डाव 60 धावांवर संपुष्टात आला. तो रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू झाला. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर कॉन्स्टासनं या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, कोहलीनं जाणूनबुजून त्याला धक्का दिला नाही.
हेही वाचा –
मेलबर्न कसोटीत रोहित शर्मा या क्रमांकावर फलंदाजी करणार, अभिषेक नायरनं स्पष्ट केलं
19 वर्षाच्या पोरानं जे केलं, ते बुमराह कधीच विसरणार नाही! करिअरमध्ये असं प्रथमच घडलं
कोहलीसोबतच्या बाचाबाचीवर सॅम कॉन्स्टासची प्रतिक्रिया, म्हणाला, “कोहलीनं जाणूनबुजून…”