नवी दिल्ली । भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने अनेकवेळा भारतीय संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. परंतु त्याला एका गोष्टीची खंत नक्कीच आहे. ती अशी, की त्याला विश्वचषकात खेळता आले नाही.
कसोटी क्रिकेटमध्ये लक्ष्मण विरोधी संघाविरुद्ध असा धावांचा आकडा उभा करायचा, की त्या पार करणे कठीण जात होते. परंतु त्याची वनडेत निवड करणेही कठीण होत होते. त्याला आपल्या आतापर्यंतच्या कारकीर्दीत विश्वचषक का खेळता आले नाही, याचे उत्तर भारतीय संघाचे माजी दिग्गज कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन (Mohammad Azharuddin) यांनी दिले आहे.
लक्ष्मण चांगले क्षेत्ररक्षण करू शकला नाही
अझरूद्दीन यांचे असे मत आहे, की लक्ष्मणला त्याच्या आयुष्यात विश्वचषक खेळण्याची संधी मिळाली नाही, हे खूप दुर्दैवी आहे. अझरूद्दीनने एका स्पोर्ट्स वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, “लक्ष्मणने अपेक्षित क्षेत्ररक्षण केले नाही. कदाचित त्यामुळेच त्याला विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली नाही.”
ते पुढे म्हणाले, “कदाचित निवडकर्त्यांना वाटले, की त्याचे क्षेत्ररक्षण फार चांगले नाही. त्यामुळे त्याला संघात सामील केले नाही. परंतु एक खेळाडू म्हणून जर बोलायचं झालं, तर लक्ष्मणने वनडेत ६ शतके ठोकली आहेत. माझ्या मते, त्याने काही शतके ऑस्ट्रेलियाविरुद्धही ठोकली आहेत. लक्ष्मण खूप चांगली क्षेत्ररक्षक होता. कसोटी सामन्यात त्याने स्लिपमध्ये १२० किंवा १३० झेल झेलले आहेत. परंतु जिथपर्यंत वनडे सामन्यांचा प्रश्न आहे, तेव्हा तुम्ही केवळ स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करू शकत नाही. तुम्हाला मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात क्षेत्ररक्षण करावे लागते.”
राहिला दुर्दैवी
असे असले तरीही अझरूद्दीन यांचा असा विश्वास आहे, कर्णधाराला वाटले असते असते, तर लक्ष्मण त्याच्या आवडत्या जागेवर क्षेत्ररक्षण करू शकला असता. परंतु तो या बाबतीत दुर्दैवी ठरला आणि विश्वचषकात खेळू शकला नाही.
“कधी-कधी आम्हाला संघ संयोजन आणि कर्णधाराच्या रणनीतीनुसार जावे लागते. माझ्यामते एक फलंदाज म्हणून तो दुर्देवी होता. कारण कर्णधाराला जर त्याला संघात घ्यायचे असते, तर तो त्याला क्षेत्ररक्षक म्हणूनही घेऊ शकला असता,” असेही ते पुढे म्हणाले.