आयपीएल च्या 13 व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने जबरदस्त खेळ करून ‘प्ले ऑफ’ मध्ये जागा मिळवली आहे आणि यात सर्वात मोठे योगदान हे संघाचा फिरकीपटू फिरकीपटू युजवेंद्र चहलचे राहिले आहे. याच पार्श्वभूमीवर न्यूझीलंडचा माजी खेळाडू स्कॉट स्टायरीशने चहल हा इतर फलंदाजांसाठी घातक असा गोलंदाज असल्याचे वक्तव्य केले आहे.
युजवेंद्र चहलने आयपीएल 2020 च्या हंगामात खेळताना आपल्या संघासाठी 14 सामन्यांत सर्वाधिक 20 बळी घेतले आहेत. सध्या ‘पर्पल कॅप’ च्या यादीत तो ‘टॉप 5’ मध्ये आहे. चहलने यूएईची परिस्थिती समजून घेत स्वतःच्या गोलंदाजीमध्ये बदल केले आहेत आणि याच बदलामुळे तो बळी घेण्यात यशस्वी ठरला व परिणामी याच गोष्टीचा फायदा त्याच्या संघाला झाला असल्याचे स्कॉट स्टायरीशचे म्हणणे आहे.
स्टायरीशने चहलच्या गोलंदाजीचे केले विश्लेषण
स्कॉट स्टायरीशने युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीचे विश्लेषण करीत तो या हंगामात काय वेगळं करतोय हे जवळपास उघड केलं आहे. स्टायरीशच्या म्हणण्यानुसार चहलने या हंगामात ‘फुल लेंथ’ वर 12 आणि ‘गुड लेंथ’ वर 5 गडी बाद केले आहेत. तर त्याने 2019 मध्ये ‘फुल लेंथ’ वर फक्त 3 आणि ‘गुड लेंथ’ वर 15 बळी घेतल्याचे सांगितले. यूएईमध्ये खेळताना चहलने खेळात कोणता अमुलाग्र बदल केलाय याबाबत स्टायरीशने विश्लेषण केले आहे.
भारत आणि यूएई मधील परिस्थिती वेगळी असल्याने आपण गोलंदाजी कशी व कोणत्या वेगाने करतो याला खूप महत्त्व असल्याचे स्टायरीश म्हणतो. स्टायरीश म्हणतो की, “चहल हवेत हळूवारपणे परंतु पुढे चेंडू फेकतो, ज्यामुळे फलंदाजाला नाईलाजाने कधीकधी चुकीचा फटका खेळण्याची वेळ येते. आणि फलंदाजाने चुका करून बाद व्हावे याकडे चहल जास्त लक्ष देतो.”





