बेंगलोर | विजय हजारे ट्राॅफीच्या पहिल्या सेमिफायनलमध्ये आज पृथ्वी शाॅने धमाकेदार खेळी केली आहे. मुंबईकडून सलामीला येताना त्याने हैद्राबादविरुद्ध त्याने बेंगलोरच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर ४४ चेंडूत ६१ धावांची खेळी केली.
या सामन्यात नाणेफेक जिंकत हैद्राबादने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हैद्राबादकडून रोहित रायडूने १३२ चेंडूत १२१ धावांची नाबाद खेळी केली तर कर्णधार अंबाती रायडूला मात्र ११ धावांवर समाधान मानावे लागले. निर्धारीत ५० षटकांत हैद्राबादने ८ बाद २४६ धावांपर्यंत मजल मारली.
२४७ धावांचे लक्ष घेऊन मैदानात आलेल्या मुंबईकडून पृथ्वी शाॅ आणि रोहित शर्माने ७३ धावांची सलामी दिली. त्यातील केवळ १७ धावा रोहितच्या होत्या. रोहित बाद झाल्यावर ९ धावांच्या अंतराने पृथ्वीही बाद झाला. परंतु त्याने आपल्या ६१ धावांच्या खेळीत तब्बल ८ चौकार आणि २ षटकारांची बरसात केली. त्याच्या याच खेळीमुळे मुंबईने ११.४ षटकांतच २ बाद ८२ अशी मजल मारली होती.
त्यानंतर श्रेयस अय्यरने नाबाद ५५ तर रहाणेने नाबाद १७ धावा केल्या. मुंबईला सध्या २५ षटकांत जिंकण्यासाठी ९२ धावांची गरज असुन ८ विकेट्स मुंबईच्या बाकी आहेत.