सध्या न्यूझीलंड संघ भारत दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. हा सामना अनिर्णीत राहिला होता. येत्या ३ डिसेंबरपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. तत्पूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव संजय नाईक यांनी नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव संजय नाईक यांनी सोमवारी (२९ डिसेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले की, “राज्य सरकारने आखून दिलेल्या सर्व नियमांचे बोर्ड काटेकोरपणे पालन करेल. राज्य सरकारने सांगितल्यानुसार,आम्ही जास्तीत जास्त २५ टक्के प्रेक्षकांना सामना पाहण्यासाठी मैदानात प्रवेश देणार आहोत.”
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शेवटचा कसोटी सामना डिसेंबर २०१६ मध्ये पार पडला होता. या सामन्यात भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ आमने सामने होते. त्यानंतर तब्बल ५ वर्ष उलटून गेली आहेत. पाच वर्षापासून या मैदानावर कसोटी सामना झाला नाहीये. याबाबत बोलताना संजय नाईक म्हणाले की, “पाच वर्षानंतर या मैदानावर कसोटी सामन्याचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे आम्ही आशा करतो की, महामारीच्या काळात प्रेक्षकांना कसोटी क्रिकेट पाहण्याचा चांगला अनुभव घेता येईल..”
वानखेडे स्टेडियममध्ये एकावेळी ३३ हजार लोक सामन्याचा आनंद घेऊ शकतात. परंतु राज्य महाराष्ट्र राज्य शासनाने २५ टक्के प्रेक्षकांना सामना पाहण्याची परवानगी दिली आहे. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच या मैदानावर आंतरराष्ट्रीय सामना होणार आहे. या मैदानावर शेवटचा सामना २०२० मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये रंगला होता.तसेच भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेला पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता. त्यामुळे हा कसोटी सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.