2026 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानने आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला असला, तरी पाकिस्तान या स्पर्धेत खेळणार की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही. सोमवार, 26 जानेवारी रोजी संध्याकाळी पीसीबी (PCB) चे अध्यक्ष मोहसिन नकवी (Mohsin Naqvi) यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Shahbaaz sharif) यांची भेट घेतली. मात्र, या बैठकीनंतरही कोणताही ठोस निर्णय होऊ शकलेला नाही.
मोहसिन नकवी यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती दिली की, त्यांनी आयसीसी (ICC) आणि टी-20 वर्ल्ड कप 2026 (ICC T20 international world cup 2026) च्या मुद्द्यावर पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि सध्याची सर्व परिस्थिती त्यांच्यासमोर मांडली. यावर पंतप्रधान शरीफ यांनी सांगितले की, पाकिस्तान या प्रकरणातील सर्व पर्यायांचा विचार करेल.
नकवी यांनी स्पष्ट केले की, या विषयावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. या आठवड्यात शुक्रवारी किंवा पुढील सोमवारी पाकिस्तान या वर्ल्ड कपमधील आपल्या सहभागाबाबत शेवटचा आणि अधिकृत निर्णय घेण्याची शक्यता आहे.






