ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघाला शनिवारी(१९ डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी घेतल्यानंतर मात्र, भारताचा दुसरा डाव ३६ धावांवरच उरकला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने ९० धावांचे आव्हान २ विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले आणि सामना जिंकला. या सामन्यानंतर भारतीय संघावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. एवढेच नव्हे तर राहुल द्रविडला ऑस्ट्रेलियाला पाठवण्याची मागणीही करण्यात आली.
आता याबद्दल राजीव शुक्ला यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. शुक्ला लवकरच बीसीसीआयचे उपाध्यक्ष बनण्याची शक्यता आहे. शुक्ला यांनी सांगितले आहे की बीसीसीआयचे सदस्य भारतीय संघाच्या कामगिरीवर नाखुश आहेत आणि ते संघव्यवस्थापनाच्या संपर्कात आहेत.
एएनआयशी बोलताना आयपीएलचे माजी अध्यक्ष असलेले शुक्ला म्हणाले, ‘आम्ही खुश नाही. या काही चांगल्या धावा नव्हत्या आणि आम्हाला नक्कीच याबद्दल काळजी आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा याबाबत चिंतीत आहेत आणि दोघेही काही योजनांवर काम करत आहेत, ज्याद्वारे कामगिरी सुधारली जाऊ शकते. ते नक्कीच संघव्यवस्थापनाच्या संपर्कात आहेत. पुढील सामन्यात भारत नक्कीच चांगली कामगिरी करेल, अशी मला आशा आहे.’
याबरोबरच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा अध्यक्ष असलेल्या द्रविडला भारतीय फलंदाजांच्या मदतीसाठी ऑस्ट्रेलियाला पाठवणार का, या प्रश्नावर शुक्ला म्हणाले, ‘कोणीही ऑस्ट्रेलियाला जाणार नाही. पहिल्या डावात आपली कामगिरी उत्तम होती. आपण पहिल्या डावात आघाडीही घेतली होती, पण आपण दुसऱ्या डावात ढेपाळलो, असे कधीतरी होते. त्यानंतर सुधारणा व्हावी म्हणून सर्व उपाय केले गेले आहेत आणि मला वाटते की आपले खेळाडू कामगिरी सुधारण्यास सक्षम आहेत. ते मेलबर्न येथील खेळपट्टी पाहून पुढील संघबांधणी करतील.’
पहिल्या कसोटीनंतर द्रविडला तातडीने ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात यावे अशी मागणी भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी केली होती.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून मेलबर्न येथे होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आश्चर्यकारकच..! विस्डेनच्या सर्वकालीन वनडे संघात सचिनचा समावेशच नाही; ‘या’ भारतीयाकडे कर्णधारपद
फुटबॉल मैदानावर घडला भयानक अपघात; कित्येक टन वजनाची शिडी कोसळली अंगावर आणि…
भाई साहब इतनी अंग्रेजी! कैफच्या ‘त्या’ ट्विटवर हरभजनची मजेदार कमेंट