प्रो कबड्डीमध्ये आज दहाव्या दिवशी सामना होणार आहे तेलगू टायटन्स आणि पटणा पायरेट्स या दोन संघामध्ये. पटणा आणि तेलुगू टायटन्स यांमध्ये या मोसमातील जो अगोदरचा सामना झाला होता त्यामध्ये पटणाचा संघ जिंकला होता. या सामन्यापासूनच तेलुगू टायटन्स संघाचे पराभवाचे सत्र चालू झाले होते.
या मोसमातील या दोन संघातील अगोदरच्या सामन्यात पटणाच्या प्रदीप नरवालने सुपर टेन तर मिळवलाच होता पण त्याच बरोबर त्यांच्या संघातील मोनू गोयत याने देखील चांगला खेळ करून सामन्यात पटणा संघाच्या विजयात वाटा उचलला होता. प्रदीपने मागील सामन्यात १५ रेडींग गुण मिळवले होते तर मोनू गोयतने ८ गुण मिळवले होते. त्याच बरोबर डिफेन्सने देखील खूप महत्वाची जबाबदारी पार पाडली होती. त्यांनी राहुल चौधरीला मोक्याच्या वेळी बाद तर केलेच पण दुसऱ्या खेळडूला गुण न देता त्याला परत मैदानात येण्याची संधीच दिली नाही.
तेलुगू टायटन्सची एक मोठी उणीव आहे ती म्हणजे राहुल बाद झाल्यानंतर त्याला रिवाईव्ह करण्यात अपयशी ठरले आहेत. या संघाकडून खेळाडू चांगला खेळ करत आहेत पण ते मोक्याच्यावेळी नांगी टाकत आहेत. राहुल चौधरी मागील काही सामान्यांपासून अतातायी होऊन रेड करत आहे आणि त्याचा संघाला फटका बसतोय. मागील सामन्यात बेंगाल वॉरियस संघाविरुद्ध तर तो डू ऑर डाय रेडला जाऊन बाद झाला. संघात अनुभवी राकेश कुमार असला तरी या स्पर्धेत त्याला आपली छाप पाडण्यात अपयश आले आहे.
विकास, निलेश साळुंखे आणि विशाल भारद्वाज चांगला खेळ करत आहेत पण मोक्याच्यावेळी ते खेळ उंचावण्यात सातत्याने अपयशी ठरत आहेत. या संघाला राहुल चौधरीवर जास्त अवलंबून न राहता सांघिक खेळ करून तेलगू टायटन्सच्या पाठिराख्यांसाठी मोसमातील घरच्या मैदानावर होणार शेवटचा सामना जिंकावाच लागेल.