लायटनिंग बोल्ट अर्थात उसेन बोल्ट हा उद्या शनिवारी होणाऱ्या वल्ड चॅम्पियनशिपच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये भाग घेणार आहे. कारकिर्दीतील शेवटची १००ची शर्यत जिंकून ज्या शर्यतीने त्याला जगातील सर्वात वेगवान धावपटू बनवले त्या शर्यतीला अलविदा करण्याच्या हेतूने बोल्ट उद्या लंडनच्या मैदानात उतरेल.
उसेन बोल्ट याचा या वर्षीचा फॉर्म तसा खराब राहिला आहे. पण बोल्ट मोठ्या स्पर्धेच्या वेळी त्याचा खेळ नेहमीच उंचावतो आणि स्पर्धा जिंकतो. त्याच्या नावावर १०० मीटर धावण्यातील सर्वात कमी वेळ ९.५८ सेकंद नोंदवल्याचा विश्वविक्रम आहे जो त्याने वल्ड चॅम्पियनशिप मधेच केला होता. पण या वर्षी त्याचे टायमिंग १० सेकंदांपेक्षा जास्त आहे, पण त्याने त्यात सुधारणा करून नुकत्याच मोनॅको येथे झालेल्या डायमंड लीगमध्ये ९.९५ इतकी वेळ नोंदवली होती.
बोल्टला त्याच्या नावाला साजेशी कामगिरी करता आली नसली तरी तो ही शर्यत जिंकेल असे चित्र आहे. त्याचा मुख्य प्रतिस्पर्धी आंद्रे डी ग्रासी हा दुखापतीमुळे या चॅम्पियनशिपमधून बाहेर पडला आहे, त्याशिवाय बोल्टला आव्हान असेल योहान ब्लेक, जस्टीन गॅटलीन, असाफा पॉवेल या धावपटूंचे.