इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामाचा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यामुळे लवकरच आयपीएलच्या १५ व्या हंगामाला देखील सुरुवात होईल. मात्र, असे असतानाच सनरायझर्स हैदराबादला (Sunrisers Hydarabad) एका गोष्टीची चिंता लागून राहिली आहे. ती गोष्ट म्हणजे केन विलियम्सन याची (Kane Williamson) दुखापत. विलियम्सन सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार आहे.
दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर
विलियम्सन गेल्या काही महिन्यांपासून हाताच्या कोपराच्या दुखापतीने त्रस्त आहे. त्याला अनेक सामन्यांनाही या दुखापतीमुळे मुकावे लागले आहे. दरम्यान तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेतूनही बाहेर झाला आहे. त्याच्याऐवजी टॉम लॅथम न्यूझीलंड संघाचे नेतृत्त्व सांभाळणार आहे. तसेच असे सांगण्यात आले आहे की, विलियम्सनला कोपऱ्याच्या दुखापतीतून सावरण्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी लागणार आहे.
त्यामुळे हैदराबाद संघालाही विलियम्सनच्या दुखापतीची चिंता वाटत आहे. हैदराबादने विलियम्सनला १४ कोटी रुपयांमध्ये आयपीएल २०२२ साठी संघात कायम केले आहे. तसेच त्याच्याकडे नेतृत्त्वपदही सोपवले आहे.
हात कापण्याचा विचारही आला – विलियम्सन
कोपराच्या दुखापतीने विलियम्सनही वैतागला असून त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहे. त्याने स्टफ.को.एनझेड ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, अनेकदा त्याच्या मनात विचार आला की, डावा हात कापून वेगळा करावा. या दुखापतीतून सावरण्यासाठी विलियम्सनने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्याकडूनही सल्ला मागितला. या दोघांनीही त्यांच्या कारकिर्दीत कोपराच्या दुखापतीचा सामना केला आहे.
विलियम्सन म्हणाला, ‘असं वाटतं की, अशा प्रकारच्या दुखापतीबाबत प्रत्येकाची वेगळी कहानी असेल. त्याचमुळे मी माझ्या कोपराच्या दुखापतीबद्दल आशावादी होतो. पण असं झालं नाही आणि खरं सांगायचं झालं तर, मला हे पचवायला कठीण जात आहे. मला माझे डोकं हलवतानाही त्रास होत आहे. पण मला न्यूझीलंड क्रिकेट आणि मेडिकल टीम पूर्ण पाठिंबा देत आहे. एक खेळाडू म्हणून दुखापतीतून सावरणे सोपे नाही.’
आता विलियम्सन या दुखापतीतून कसा आणि कधीपर्यंत सावरणार हे पाहावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अष्टपैलू खेळाडू असावा तर ‘असा’ आयपीएल ऑक्शनपूर्वी, सलग ५ व्या सामन्यात पटकावला सामनावीर पुरस्कार
आयपीएल मेगा ऑक्शनबद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला कोणीही सांगणार नाही, घ्या जाणून एकाच क्लिकवर
टीम इंडियाची ‘फिनीक्स भरारी’! वेस्ट इंडीजचा पराभव करत ४० वर्षांपूर्वीच्या कामगिरीची केली पुनरावृत्ती