जयपूर। शनिवारी(27 एप्रिल) सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद संघात आयपीएल 2019 चा 45 वा सामना पार पडला. या सामन्यात राजस्थानने 7 विकेट्सने विजय मिळवला असून स्पर्धेतील आव्हानही कायम ठेवले आहे. त्याचबरोबर राजस्थानच्या या विजयामुळे चेन्नई सुपर किंग्सला फायदा झाला आहे.
चेन्नई सुपर किंग्सने 12 सामन्यांपैकी 8 सामने जिंकून 16 विजयांसह प्लेऑफमधील जागा पक्की केली आहे. त्यामुळे चेन्नई प्लेऑफ 2019 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला आहे. त्याचबरोबर चेन्नईने आत्तापर्यंत खेळलेल्या सर्व आयपीएल मोसमात प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याचा पराक्रमही केला आहे.
चेन्नईचे साखळी फेरीतील अजून 2 सामने बाकी आहेत. त्यामुळे हे दोन सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम राहण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. त्याचबरोबर सध्या गुणतालिकेत चेन्नई पाठोपाठ 14 गुणांसह अनुक्रमे मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आहेत.
या दोन्ही संघांचे साखळी फेरीतील प्रत्येकी 3 सामने बाकी असून त्यांनाही उर्वरित सर्व सामने जिंकून 20 गुण मिळवण्याची तसेच पहिल्या दोन स्थानांवर विराजमान होण्याची संधी आहे.
त्याचबरोबर गुणतालिकेत प्रत्येकी 11 सामन्यांनंतर सनरायझर्स हैद्राबाद आणि किंग्स इलेव्हन पंजाब हे 10 गुणांसह अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. त्यांचेही अजून साखळी फेरीतील 3 सामने बाकी आहेत. त्यामुळे त्यांना हे तीनही सामने जिंकून 16 गुण मिळवण्याची संधी आहे.
परंतू त्यांचा नेट रनरेट हा चेन्नईपेक्षा कमी असल्याने चेन्नईचा प्लेऑफमधील प्रवेश पक्का झाला आहे. मात्र हैद्राबाद आणि पंजाबला प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करावी लागेल.
तसेच राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकता नाईट रायडर्स यांना जास्तीत जास्त 14 गुण मिळवण्याची संधी आहे. त्यामुळे त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी साखळी फेरीतील उर्वरित सर्व सामने जिंकण्याबरोबरच अन्य सामन्यांच्या निकालावरही अवलंबून रहावे लागणार आहे.

प्लेऑफचे सामने 7 मे पासून चालू होणार आहेत. 7 मेला पहिली क्वालिफायर चेन्नईमध्ये होईल. त्यानंतर 8 मेला होणारा एलिमिनेटरचा सामना आणि 10 मेला होणारा क्वालिफायर 2 चा सामना विशाखापट्टणमला होईल. तसेच अंतिम सामना 12 मेला हैद्राबादला होईल.
https://twitter.com/IPL/status/1122205457118945280
महत्त्वाच्या बातम्या –
–हार्दिक पंड्याने हिटमॅनला दिला अॅव्हेंजर्समध्ये सामील होण्याचा सल्ला
–इंग्लंडला परतण्यापूर्वी बेन स्टोक्सचा राजस्थान रॉयल्सला भावनिक गुडबाय, पहा व्हिडिओ
–२०१९ विश्वचषकासाठी १६ पंचांची आयसीसीने केली घोषणा, फक्त एका भारतीय पंचाचा समावेश






