वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (WIvsIND) यांच्यात पहिला वनडे सामना शुक्रवार (२२ जुलै) त्रिनिदादमधील पोर्ट ऑफ स्पेनच्या क्विन्स पार्क ऑफ ओव्हल या स्टेडियमवर रंगला. हा सामना भारताने ३ धावांनी जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. यामध्ये यजमान संघाचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. यावेळी सलामीसाठी आलेल्या धवन-शुबमन गिल जोडीने महत्वाची खेळी करत पहिल्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी केली आहे.
शिखर धवन (Shikhar Dhawan) याने कर्णधार पदाला साजेशी खेळी केली आहे. त्याने ९९ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ९७ धावा केल्या आहेत. यावेळी त्याने शुबमन गिल (Shubman Gill) याच्यासोबत पहिल्या विकेटसाठी ११९ धावांची भागीदारी केली आहे. ही भारताची वेस्ट इंडिजमधील वनडेतील तिसऱ्या क्रमांकाची सलामी भागादारी ठरली आहे. तसेच आधीच्या दोन्ही भागीदारीमध्ये धवनचे नाव कायम आहे.
धवन-अजिंक्य रहाणे यांनी २०१७च्या दौऱ्यातील पहिल्या वनडे सामन्यात १३२ धावांची सलामी भागीदारी केली होती. हा सामना याच मैदानावर खेळला गेला. पावसामुळे हा सामना रद्द झाला होता. ही भारताची वेस्ट इंडिजमधील वनडेतील पहिल्या विकेटची सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. तसेच रोहित शर्मा-धवन यांनी केलेली १२३ धावांची भागीदारी दुसऱ्या क्रमांकाची ठरली आहे. २०१३मध्ये झालेल्या तिरंगी मालिकेत रोहित-धवन जोडीने याच मैदानावर ही भागीदारी केली होती. हा सामना भारताने डकवर्थ-लुईसच्या नियमानुसार १०२ धावांनी जिंकला होता.
या तिन्ही भागीदाऱ्या पाहिल्या तर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे, धवन आणि मैदान या दोन्ही बाबी कायम आहे. गिल बाद झाल्यावर धवनने त्याची खेळी संथ न करता श्रेयस अय्यरच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी केली. अय्यरने ५४ धावा केल्या. या सामन्यात भारताने ५० षटकात ७ विकेट्स गमावत ३०८ धावा केल्या. भारतीय फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली तर नंतर गोलंदाजांनीही त्यांची उत्तम कामगिरी करत यजमान संघाला ५० षटकात ६ विकेट्स घेत ३०५ धावांवर रोखले. यावेळी मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल आणि शार्दुल ठाकुर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
भारतासाठी वेस्ट इंडिजमधील सर्वोच्च सलामीची भागीदारी (वनडे)
१३२ – शिखर धवन/अजिंक्य रहाणे
१२३ – शिखर धवन/रोहित शर्मा
११९ – शिखर धवन/शुबमन गिल
या मालिकेतील दुसरा वनडे सामना रविवारी (२४ जुलै) खेळला जाणार आहे. हा सामना याच मैदानावर खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WIvIND: काट्याच्या लढतीत टीम इंडियाचा विजयाने श्रीगणेशा; वेस्ट इंडिज अवघ्या ३ धावांनी पराभूत
तुफानी अर्धशतकासह श्रेयस दिग्गजांच्या पंक्तीत; फोडून काढली कॅरेबियन गोलंदाजी






