एफआयएच महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेला १ जुलैपासून सुरूवात झाली आहे. स्पेन आणि नेदरलॅंड्समध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघाचा ब गटात समावेश आहे. मंगळवारी (५ जुलै) झालेला भारत विरुद्ध चीन सामना १-१ असा बरोबरीत सुटला आहे. हा सामना वॅगनर हॉकी स्टेडियम, ऍमस्टेलवीन येथे खेळला गेला आहे.
या सामन्यात चीनची जीएली झेंगने २५व्या मिनिटाला गोल करत आघाडी घेतली होती. त्यानंतर भारताच्या वंदना कटारिया (Vandana Katariya) हीने ४४व्या मिनिटाला गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. पुन्हा एकदा भारताने तिच्या गोलच्या जोरावर सामना गमावण्यापासून वाचवला आहे.
भारताचा या स्पर्धेतील हा सलग दुसरा अनिर्णित सामना ठरला आहे. याआधी भारताने पहिल्या सामन्यात टोकियो ऑलिम्पिक कांस्य पदक विजेत्या इंग्लंड संघाला १-१ असे बरोबरीत रोखले होते. या सामन्यातही वंदनाने २७व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत संघाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या.
चीन विरुद्धच्या सामन्यात पहिल्या दोन सत्रात भारतीय संघाची सामन्यात चांगली पकड होती. मात्र गोल करण्यात ते अपयशी ठरत होते. दुसरीकडे चीनचा संघ आक्रमकपणे खेळत भारताची पकड सैल करण्याचा प्रयत्न करत होता.
सामन्याच्या ९व्या मिनिटाला नवनीत कौरने वंदनासोबत गोल करण्याचा प्रयत्न केला मात्र चीनची गोलकिपर लीयू पिंगने तो उत्तमरित्या रोखला. २३व्या मिनिटाला भारत या सामन्यातील पहिला गोल करण्याच्या फार जवळ आला होता. पण गोलपोस्ट भारताचा अडसर ठरला आहे. त्यानंतर ज्योतीने केलेला गोल पंचांनी नाकारला.
Full Time!
Despite playing hard, the Hockey match in Amsterdam ends evenly!🇮🇳 1:1 🇨🇳#IndiaKaGame #HockeyIndia #HWC2022 #HockeyInvites #HockeyEquals #ChakDeIndia #MatchDay @sports_odisha @CMO_Odisha @IndiaSports @Media_SAI pic.twitter.com/4YxbJ4Aizr
— Hockey India (@TheHockeyIndia) July 5, 2022
भारताला या सामन्यातील पहिली पेनल्टी कॉर्नर मिळाली, पण त्याचे गोलमध्ये रूपांतर करण्यात अयशस्वी ठरले. त्यातच चीनने झेंगने केलेल्या गोलने आघाडी घेतली. हा गोल भारताची गोलकिपर-कर्णधार सविता पुनिया (Savita Punia) हिला रोखता आला नाही.
सामन्याच्या ४२व्या मिनिटाला भारताने सतत दोन पेनल्टी कॉर्नर मिळवले, पुन्हा एकदा भारताला त्याचे गोलमध्ये रूपांतर करण्यात यश आले नाही. तिसरे सत्र संपण्यास काही सेंकद शिल्लक असतानाच पेनल्टी कॉर्नरवर गुरजीत कौरच्या फ्लिकवर वंदनाने अचूक गोल करत संघाला १-१ असे बरोबरीत आणले. यामुळे भारताला जरा धीर आला होता.
चीनने खेळ उंचावत ५४व्या मिनिटाला गोल करण्याचा प्रयत्न केला, यावेळी भारताने कोणतीही चूक न करता त्याचा बचाव केला आहे. या सत्रामध्ये भारताचेच वर्चस्व राहिले. यामुळे भारताला सलग दुसऱ्या सामन्यात बरोबरीत समाधान मानावे लागले आहे. ब गटाच्या गुणतालिकेत भारत २ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
भारतीय संघाचा पुढील सामना ७ जुलैला न्यूझीलंड विरुद्ध असणार आहे. न्यूझीलंडच्या खात्यात एक विजय आणि एक अनिर्णीत सामना असल्याने ते ब गटाच्या गुणतालिकेत ४ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. हा सामना भारताला जिंकणे आवश्यक आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाचा महागुरूही शोधतोय ‘बझबॉल’चा अर्थ, राहुल द्रविडने दिलेले उत्तर होत आहे व्हायरल
ऍजबस्टन कसोटीत इंग्लंडने वापरलेली ‘बझबॉल’ रणनीती आहे तरी काय? कोच मॅक्यूलमशी कनेक्शन
इंग्लंडविरुद्धचा पराभव भारताच्या जिव्हारी; WTCमधील २ गुण तर कापले गेलेच, पाकिस्तानलाही झालाय फायदा