न्यूझीलंडमध्ये खेळला जात असलेला आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक अंतिम टप्पात पोहोचला आहे. इंग्लंडच्या महिला संघाने गुरुवारी (२४ मार्च) त्यांचा सलग तिसरा विजय मिळवला. हा सामना पाकिस्तानविरुद्ध असून क्राइस्टचर्चमध्ये खेळला गेला. इंग्लंड ९ विकेट्स राखून हा विजय मिळवला. या विजायानंतर इंग्लंड संघाच्या उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचण्याच्या आशा अधिकच मजबूत झाल्या आहेत, तर दुसरीकडे भारतीय संघासाठी उपांत्य सामन्यात पोहोचणे आता थोडे अवघड होऊन बसले आहे.
इंग्लंडने त्यांचे सुरुवातीचे तिन्ही सामन्यात पराभव पत्करला होता. परंतु, भारतासोबत पहिला विजय मिळवल्यानंतर त्यांचा संघ मागे वळून पाहण्याचे नाव घेत नाहीये. त्यांनी आत्तापर्यंत खेळलेल्या ६ सामन्यांपैकी ३ सामने जिंकून इंग्लंड संघ ६ गुणांसह गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
भारतीय संघाचा विचार केला, तर मिताली राजच्या नेतृत्वातील संघ गुणतालिकेत ५ व्या क्रमांकावर आहे. भारताकडे आता ६ गुण आहे, पण नेट रन-रेटच्या बाबतीत भारत इंग्लंडपेक्षा मागे आहे. याच कारणास्तव गुण जरी सारखे असले, तरी इंग्लंडने भारताला मागे टाकले आहे. गुणतालिकेतील पहिले चार संघ उपांत्य सामन्यात खेळू शकणार आहेत. २६ मार्च रोजी उपांत्या सामन्यातील संघ निश्चित होतील.
आयसीसी महिला विश्वचषक २०२२ (ICC Women’s World Cup 2022) मध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका संघ यांनी आधीच उपांत्य सामन्यात जागा पक्की केली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि त्यांना ६ पैकी एकही सामना गमावला नाही. ऑस्ट्रेलिया संघ १२ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडीज आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात गुरुवारी झालेला सामना पावसामुळे रद्द करावा लागला आणि दोन्ही संघांना १-१ गुण दिला गेला. यानंतर दक्षिण अफ्रिका दुसऱ्या तर वेस्ट इंडीज तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारत आणि इंग्लंड संघांना प्रत्येक १-१ सामना अजूनही खेळायचा बाकी आहे.
भारताला विश्वचषकाच्या ग्रुप स्टेजमधील त्यांचा शेवटचा सामना दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळायचा आहे, जो ख्राइस्टचर्चमध्ये खेळला जाईल, तर दुसरीकडे त्याच दिवशी इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यातील शेवटाच सामना, वेलिंगटनमध्ये खेळला जाईल. या दोन सामन्यातील निकाल उपांत्या सामन्यापर्यंत पोहोचणारा शेवटचा संघ ठरवणार आहे. भारताला जर उपांत्य फेरी गाठायची असेल, तर संघाला त्याचा शेवटचा सामना मोठ्या अंतराने जिंकावा लागेल आणि खेळाडूंनी चांगले प्रदर्शन करणे अपेक्षित आहे.
महत्वाच्या बातम्या –
आयपीएल सुरू होण्यापूर्वीच कोलकाताला जबर धक्का; दोन प्रमुख खेळाडू पहिल्या ५ सामन्यांना मुकणार
मोठी घोषणा! आता महिला कुस्तीपटूंचीही महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार