महिला टी20 विश्वचषकाच्या 18व्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतीय संघासमोर विजयासाठी 152 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या धावसंख्येचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. मात्र त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांनी शानदार भागीदारी करत भारताला सामन्यात परत आणलं. दीप्ती शर्मा 16व्या षटकात 29 धावा करून बाद झाली, ज्यानंतर टीम इंडियानं आपली लय गमावली. दीप्ती बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियानं पुढच्याच षटकात स्फोटक फलंदाज रिचा घोषला बाद केलं. तिनं केवळ 1 धाव केली.
17 षटकांनंतर भारताची धावसंख्या 5 विकेट गमावून 112 धावा होती. टीम इंडियाला शेवटच्या तीन षटकात विजयासाठी 40 धावांची आवश्यकता होती. यानंतर हरमनप्रीत कौर आणि पूजा वस्त्राकर या जोडीनं 18व्या षटकात 12 आणि 19व्या षटकात 14 धावा करत भारताला विजयाच्या जवळ आणलं.
शेवटच्या षटकात टीम इंडियाला विजयासाठी 14 धावांची आवश्यकता होती. त्यावेळी कर्णधार हरमनप्रीत कौर अर्धशतक झळकावून क्रीजवर उपस्थित होती. तर भारताच्या 5 विकेट्स शिल्लक होत्या. हरमन हा सामना सहज जिंकवून देईल, अशी सर्वांना अपेक्षा होती. परंतु चाहत्यांना मोठा धक्का तेव्हा बसला, जेव्हा हरमनप्रीत कौरनं षटकाच्या पहिल्याच चेंडूवर धाव घेण्याचा निर्णय घेतला आणि पूजा वस्त्राकरला स्ट्राईक दिली. पूजानं मागच्या षटकात एक चौकार मारला होता, परंतु वरिष्ठ फलंदाज असल्यानं येथे हरमनप्रीत कौरनं जबाबदारी स्वीकारणं गरजेचं होतं.
षटकाच्या पुढच्याच चेंडूवर पूजा बाद झाली आणि भारताला सहावा धक्का बसला. पूजा वस्त्राकर बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेली अरुंधती रेड्डी धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद झाली. मात्र चांगली गोष्ट म्हणजे हरमनप्रीत कौर स्ट्राईकवर परतली. परंतु आता शेवटच्या तीन चेंडूंवर भारताला विजयासाठी 13 धावांची गरज होती. या निर्णायक क्षणी दोन षटकार मारण्याची ताकद हरमनकडे होती. पण षटकाच्या चौथ्या चेंडूवर तिनं जे केलं ते निराशाजनक होतं.
हरमनप्रीतनं चौथ्या चेंडूवर एक धाव घेत श्रेयंका पाटीलला स्ट्राईक दिली. हरमनप्रीत मोठे शॉट्स खेळण्याचा प्रयत्न करत नव्हती असं नाही, परंतु या महत्त्वाच्या क्षणी एक धाव घेणं म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या पुढ्याच विजया आणून ठेवण्यासारखं होतं. झालंही असंच. पुढच्या चेंडूवर श्रेयंका धावबाद झाली आणि त्यानंतर राधा यादवही पाचव्या चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतली. शेवटच्या चेंडूवर हरमनप्रीत कौर नॉन स्ट्रायकर एंडवर होती, ज्यावर रेणुका सिंगनं धाव घेतली.
या शेवटच्या षटकात हरमनप्रीत कौरला फक्त दोन चेंडू खेळण्याची संधी मिळाली. तिनं या दोन्ही चेंडूंवर एकेरी धाव घेतली. हरमनचा हा गेम सेन्स चाहत्यांना अजिबात आवडला नाही. यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
या पराभवानंतर भारत थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही. टीम इंडिया आता कोंडीत अडकली आहे. जर पाकिस्ताननं आज न्यूझीलंडला हरवलं, तरच टीम इंडियाला सेमीफायनलचं तिकीट मिळू शकतं. मात्र यासाठीही एक अट आहे. पाकिस्तानचा रनरेट टीम इंडियापेक्षा कमी असणं गरजेचं आहे. एकूणच उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी भारतीय संघाला अन्य संघांवर अवलंबून रहावं लागणार आहे.
हेही वाचा –
वर्ल्डकप विजेत्या खेळीपासून मुख्य प्रशिक्षक बनण्यापर्यंत, गौतम गंभीरचं भारतीय क्रिकेटमधील योगदान
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी संघाला मोठा धक्का, अष्टपैलू खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर
भारताला करावी लागेल पाकिस्तानच्या विजयाची प्रार्थना, वर्ल्ड कप सेमीफायनलचं समीकरण जाणून घ्या