आज महिला हॉकी विश्वचषकात भारत विरुद्ध आयर्लंड असा उपांत्य पूर्व सामना आहे. जर हा सामना भारताने जिंकला तर तब्बल 44 वर्षानंतर ते उपांत्य सामन्यात खेळतील.
मंगळवारी (३१ जुलै) बाद फेरीच्या सामन्यात भारताने इटलीचा ३-० असा पराभव करत उपांत्य पूर्व फेरी गाठली. या सामन्यात लालरेम सियामीने (20व्या मिनिटाला), नेहा गोयलने(45व्या) आणि वंदना कटारीयाने(55व्या) गोल केले.
भारतीय संघाचा हा सातवा विश्वचषक असून ते 1974मध्ये पहिल्यांदा खेळले आहेत. त्यावेळी ते उपांत्य फेरीत पोहचले होते. फ्रान्समध्ये झालेल्या या स्पर्धेत भारतीय संघ चौथ्या स्थानावर राहिला होता. तसेच अर्जेंटिना येथे झालेल्या 2010च्या विश्वचषक स्पर्धेत ते आठव्या स्थानावर राहिले.
जागतिक क्रमवारीत 10व्या क्रमांकावर असलेल्या भारताने विश्वचषक स्पर्धेत आठ वर्षानंतर विजय हा प्राप्त केला. गेल्या दोन विश्वचषकासाठी पात्र न झाल्याने भारताला या स्पर्धेत सहभागी होता आले नव्हते.
जागतिक क्रमवारीत 16व्या क्रमांकावर असलेल्या आयर्लंड पहिल्यांदाच उपांत्य पूर्व फेरीत पोहचला आहे. आयर्लंडचा संघ या स्पर्धेत पूल बी मध्ये अमेरिका आणि भारताच्या पुढे आहे.
आयर्लंडनी या स्पर्धेत अमेरिकेला 3-1 आणि भारताला 1-0 ने पराभूत केले आहे. पण त्यांना इंग्लंडकडून 0-1 असा पराभव स्विकारावा लागला.
याच आयर्लंडच्या संघाने भारतीय संघाला आधीही दोन वेळा पराभूत केले आहे. त्यातील एक पराभव हा हॉकी वर्ल्ड लीगमध्ये 2-1ने तर याच स्पर्धेतील केलेला 1-0 असा दुसरा पराभव आहे.
इटलीविरुद्धच्या सामन्यात भारतीय स्ट्रायकर्सनी चांगला खेळ केला.
कर्णधार राणी रामपालच्या मते, संघाने मागील सामन्यात केलेल्या कामगिरीमुळे आत्मविश्वास दुणावला आहे. यापुढेही तो असाच कायम ठेवायचा असून स्पर्धेत शेवटपर्यंत टिकायचे आहे.
“स्पर्धेच्या सुरूवातील आम्ही गोल करण्यात अपयशी ठरलो. पण आता आम्हाला लय सापडली आहे. उद्याच्याच सामन्याने आमचा प्रवास संपणार याचा आम्ही विचार केला नाही”, असे रामपालने पुढे म्हटले आहे.
तर दुसरा उपांत्य पुर्व फेरीचा सामना यजमान इंग्लंड विरुद्ध नेदरलॅंड असा होणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.