आजपासून स्कॉटलंडच्या ग्लासगो शहरात बॅडमिंटनची वल्ड चॅम्पियनशीप स्पर्धा सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय बॅडमिंटन खेळाडू या शहरात पोहचले आहेत.या वर्षी भारताकडून खूप मजबूत संघ पाठवण्यात आला आहे. मागील दोन वर्षात भारतीय एकेरीच्या खेळाडूंचा जागतीक सुपर सिरीजच्या स्पर्धांमध्ये बोलबाला राहिला आहे.
महिलांच्या एकेरीमध्ये भारताकडून सायना नेहवाल आणि ऑलम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू यांच्यावर सारी मदार असणार आहे. पुरुषांच्या एकेरीमध्ये भारताची सारी मदार किदांबी श्रीकांत आणि साई प्रणीत यांच्यावर असणार आहे.
किदांबी श्रीकांत
किदांबी श्रीकांत हा सध्या जागतीक बॅडमिंटन क्रमवारीत आठव्या स्थानावर आहे. इंडोनिशियन सुपर सिरीज आणि ऑस्ट्रेलियन सुपर सिरीज जिंकून तो सलग दोन सुपर सिरीज जिंकणारा पहिला भारतीय बॅडमिंटन खेळाडू ठरला आहे. ऑस्ट्रेलियन सुपर सीरीजच्या अंतिमफेरीत त्याने ऑलम्पिक सुवर्णपदक विजेता चेन लॉन्ग याला हरवाले होते.
या मोसमात उत्तम फॉर्ममध्ये असणाऱ्या श्रीकांतकडून या स्पर्धेत पदकाची अपेक्षा असणार आहे. अगोदर जागतीक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर पोहचलेला श्रीकांत दुखापतीमुळे क्रमवारीत घसरला होता. एप्रिलमध्ये झालेल्या सिंगापूर सुपर सिरीजमध्ये देखील श्रीकांत अंतिमफेरीत पोहचला होता पण त्याला भारताच्याच साई प्रणीतने त्यालापराभूत केले होते.
साई प्रणीत
जागतीक बॅडमिंटन क्रमवारीत साई प्रणीत १९ व्या स्थानावर आहे. मागील काही स्पर्धेत त्याची कामगिरी उत्तम राहिली आहे. एप्रिलमध्ये झालेल्या सिंगापूर सुपर सिरीजचे साई प्रणीतने विजेतेपद पटकावले होते. मागील काही स्पर्धेतील त्याची कामगिरी पाहता हा खेळाडू या स्पर्धेत नक्कीच चांगली कामगिरी करेल.
साईना नेहवाल
लंडन ऑलम्पिक बॅडमिंटन येथे कांस्य पदक विजेती खेळाडू सध्या जागतीक क्रमवारीत १२ व्या स्थानावर आहे. साईनाला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे. २०१५ साली जकार्ता येथे पार पडलेल्या जागतीक बॅडमिंटन स्पर्धेत साईनाने रौप्य पदकाची कमाई केली होती. दुखापत आणि खराब फॉर्मशी झगडणाऱ्या साईनाची या स्पर्धत कामगिरी कशी होते याकडे सर्वांचे लक्ष्य लागून आहे.
पी.व्ही. सिंधू
रिओ ऑलम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी पी.व्ही.सिंधू सध्या जागतिक क्रमवारीत ५ व्या स्थानावर आहे. सईद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि त्यानंतर इंडिया ओपन जिंकून तिने आपण चांगल्या फॉर्ममध्ये आहोत हे दाखवले आहे. पी.व्ही. सिंधूला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे. पी.व्ही. सिंधूकडून भारतीयांना पदकाची आशा असणार आहे.