fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

सर्वाधिक वेळा वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणारे ५ संघ

World Cup Record Teams with Most Number Of Semi Finals

क्रिकेटच्या अनेक मोठ-मोठ्या स्पर्धा होतात. त्यापैकी एक म्हणजे विश्वचषक. मग ते वनडे विश्वचषक असो किंवा टी२० विश्वचषक असो, दोन्हींचेही महत्त्व तेवढेच असते. कारण, दर ४ वर्षांतून एकदा विश्वचषक स्पर्धा होत असते. त्यामुळे प्रत्येक संघाचे स्वप्न असते की, चषकावर आपल्या देशाचे नाव कोरले जावे.

परंतु, विश्वचषकाच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक संघाला साखळी फेरी पार करावी लागते. साखळी फेरीतून बाहेर पडलेल्या संघांमध्ये उपांत्यपूर्व सामने होतात. मग त्यातील संघांमध्ये पुढे उपांत्य फेरी सामने आणि यातून विजयी होणाऱ्या २ संघांमध्ये अंतिम सामना खेळला जातो.

क्रिकेटचे जनक असणाऱ्या इंग्लंड संघाने १९९२मध्ये विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठल्यानंतर तब्बल २७ वर्षांनंतर म्हणजे २०१९ला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. तर, भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या संघांनी कित्येकदा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली आहे.

या लेखात आपण, सर्वाधिक वेळा विश्वचषकाचा उपांत्य फेरी सामना गाठणाऱ्या संघांविषयी जाणून घेणार आहोत- World Cup Record Teams with Most Number Of Semi Finals

ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड (८ वेळा) –

१९७५ पासून आरंभ झालेल्या विश्वचषकाचे आतापर्यंत १२ स्पर्धा झाल्या आहेत. दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघ आतापर्यंत सर्वाधिक ८ वेळा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचले आहेत. ऑस्ट्रेलियाने १९७५, १९८७, १९९६, १९९९, २००३, २००७, २०१५ आणि २०१९ असे मिळून ८वेळा उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे.

त्यापैकी ऑस्ट्रेलिया संघ ७ वेळा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाने त्यातील २ वेळा उपविजेता आणि तर ५ वेळा विजेता होण्याचा मान मिळवला आहे.

ऑस्ट्रेलियाचा शेजारी देश न्यूझीलंडदेखील आतापर्यंत ८ वेळा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. न्यूझीलंड संघ १९७५, १९७९, १९९२, १९९९, २००७, २०११, २०१५ आणि २०१९मध्ये उपांत्य फेरीत पोहोचला होता. त्यापैकी, फक्त २ वेळा उपविजेता होण्याचा मान न्यूझीलंडने मिळवला आहे. परंतु, दुर्दैवाने एकदाही न्यूझीलंडला चषक पटकावता आलेला नाही.

भारत (७ वेळा) –

१९८३ला वेस्ट इंडिजला पराभूत करत तर २०११ला श्रीलंकाला पराभूत करत भारताने चषकावर आपले नाव कोरले आहे. जरी भारत २ वेळा विश्वविजेता ठरला असला, तरी भारताने तब्बल ७ वेळा उपांत्य फेरी गाठली आहे. भारतीय संघ २००३मध्ये विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत झाला होता. यामध्ये १९८३, १९८७, १९९६, २००३, २०११, २०१५ आणि २०१९ यांचा समावेश आहे.

पाकिस्तान, इंग्लंड (६ वेळा) –

पाकिस्तान संघाने ६ वेळा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली आहे. सर्वप्रथम १९७९मध्ये पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत पोहोचला होता. त्यानंतर १९८३, १९८७, १९९२, १९९९ आणि २०११ मध्ये पाकिस्तान संघ विश्वचषकाच्या अंतिम ४ संघांमध्ये पोहोचला होता. त्यापैकी २ वेळा अंतिम सामना गाठत पाकिस्तान १९९२मध्ये विश्वविजेता आणि १९९९मध्ये उपविजेता ठरला होता.

पाकिस्तानव्यतिरिक्त इंग्लंड संघदेखील ६ वेळा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. सर्वप्रथम १९७५मध्ये इंग्लंड संघ प्रथम उपांत्य फेरीत पोहोचला होता. त्यानंतर १९७९, १९८३, १९८७ आणि १९९२मध्ये इंग्लंडने विश्वचषकांच्या अंतिम ४ संघांमध्ये प्रवेश मिळवला होता.  पुढे तब्बल २७ वर्षांनी म्हणजे २०१९मध्ये इंग्लंड विश्वचषकांच्या उपांत्य फेरीत पोहोचला आणि त्याचवर्षी चषक पटकावण्याचा कारनामाही केला.

वेस्ट इंडिज, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका (४ वेळा) –

विश्वचषकाच्या सुरुवातीच्या २ वर्षांत म्हणजे १९७५ आणि १९७९मध्ये वेस्ट इंडिजने विश्वचषक जिंकला होता. तर, पुढील १९८३मध्ये वेस्ट इंडिज उपविजेता ठरला होता. अशाप्रकारे या (१९७५, १९७९, १९८३) ३ वर्षांत आणि १९९६मध्ये वेस्ट इंडिजने उपांत्य फेरी गाठली होती.

तर, विश्वचषकाच्या १२ टूर्नामेंटमध्ये १९९६ मध्ये फक्त एकदा विश्वचषकावर आपले नाव कोरणारा श्रीलंका संघही ४वेळा उपांत्य फेरीत पोहोचला आहे. तर, २००७ आणि २०११मध्ये उपविजेता ठरला आहे. अशाप्रकारे या ३ वर्षांत आणि २००३मध्ये श्रीलंका संघ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला होता.

दक्षिण आफ्रिका संघाचे दुर्दैव असे आहे की, ते जिंकता-जिंकता नॉक आउटमध्ये खराब प्रदर्शन करुन विश्वचषकातून बाहेर होतात. दक्षिण आफ्रिकाने १९९२, १९९६, २००७ आणि २०१५ मध्ये मिळून ४ वेळा उपांत्य फेरीत प्रवेश मिलवला आहे. परंतु, १९९२ आणि २०१५मध्ये डकवर्थ लुइस नियमामुळे ते विश्वचषकातून बाहेर झाले.

तर, १९९९सालच्या विश्वचषकातील उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघात सामना बरोबरीत सुटल्याने दक्षिण आफ्रिका संघ अंतिम सामन्यात पोहोचू शकला नाही. कारण, सुपर सिक्स टेबलमध्ये त्यांचा नेटरनेट कमी असल्याने ऑस्ट्रेलिया संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला.

केनिया (१ वेळा) –

या सर्व संघांव्यतिरिक्त केनिया हा संघ २००३मध्ये विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला होता.

झिंबाब्वे, आयर्लंड, बांगलादेश, नेदरलॅंड्स, कॅनडा, अफगाणिस्तान, स्काॅटलंड व युएई संघ मात्र कधीही विश्वचषकाच्या उपांत्यफेरीत प्रवेश करु शकले नाहीत.

ट्रेंडिंग लेख-

वनडे कर्णधार असताना समोरच्या संघाला जबरदस्त धुणारे ५…

वनडे सिरीजमध्ये षटकारांचा पाऊस पाडणारे ५ खेळाडू, चौथे नाव…

अविश्वसणीय! वनडेत १०००० धावा, १०० विकेट्स व १०० झेल घेणारे ५…

You might also like