दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू वियान मुल्डरने (Viaan Mulder) सोमवारी बुलावायोच्या क्वीन्स स्पोर्ट्स क्लब मैदानावर झिम्बाब्वेच्या विरुद्ध कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून पदार्पण करत ऐतिहासिक कामगिरी केली. मुल्डर कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कर्णधार म्हणून पदार्पणाच्या डावात त्रिशतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे.
त्याने पहिल्या डावात नाबाद 264 धावांपासून पुढे खेळ सुरू ठेवत आपली धावसंख्या तीन आकड्यांच्या चांगल्या टप्यावर नेली आणि 297 चेंडूत त्रिशतक पूर्ण केले. हे कसोटी क्रिकेटमधील दुसरे सर्वात वेगवान त्रिशतक आहे. यापेक्षा वेगाने त्रिशतक फक्त भारताच्या वीरेंद्र सेहवागने (Virendra sehwag) यांनीच केले होते, ज्यांनी 2008 मध्ये चेन्नईत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 278 चेंडूत 300 धावा केल्या होत्या.
मुल्डरने आपल्या खेळीत एकूण नाबाद 367 धावा केल्या. या वेळी त्याने 334 चेंडू खेळले त्यामध्ये 49 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे.
त्याने न्यूझीलंडच्या ग्राहम डॉवलिंगचा विक्रम मोडला. डॉवलिंगने 1969 मध्ये भारताविरुद्ध कर्णधार म्हणून पदार्पणात 239 धावा केल्या होत्या. मुल्डरने ग्रेम स्मिथचा विक्रमही मागे टाकला, ज्याने 2003 मध्ये इंग्लंडविरुद्ध 277 धावा केल्या होत्या. यासोबतच मुल्डर दक्षिण आफ्रिकेसाठी कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
तसेच, त्याने हॅरी ब्रूकचा (Harry Brook) विक्रमही मागे टाकला, ज्याने गेल्या वर्षी पाकिस्तानविरुद्ध 310 चेंडूत त्रिशतक झळकावले होते. मुल्डर हाशिम आमलानंतर दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटीत त्रिशतक करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. मुल्डरची ही खेळी दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट इतिहासात एक सुवर्णक्षण ठरली आहे.
कर्णधार म्हणून पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज (दोन्ही डाव मिळून)
367 – वियान मुल्डर वि. झिम्बाब्वे, (2025)
256 – विराट कोहली वि. ऑस्ट्रेलिया, (2014)
244 – ग्राहम डॉवलिंग वि. भारत, (1968)
232 – ग्रेग चॅपेल वि. वेस्ट इंडीज, (1975)
212 – अॅलिस्टेअर कुक वि. बांगलादेश, (2010)
कसोटी इतिहासातील एका दिवसात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू:
309 – डॉन ब्रॅडमन वि. इंग्लंड, (1930)
295 – वॉली हॅमंड वि. न्यूझीलंड, (1933)
284 – वीरेंद्र सेहवाग वि. श्रीलंका, (2009)
273 – डेनिस कॉम्प्टन वि. पाकिस्तान, (1954)
271 – डॉन ब्रॅडमन वि. इंग्लंड, (1934)
264* – वियान मुल्डर वि. झिम्बाब्वे, (2025*)
257 – वीरेंद्र सेहवाग वि. दक्षिण आफ्रिका, (2008)