पुणे ।भारत अ मुलांच्या संघाने महाराष्ट्र शासन, आंतरराष्ट्रीय शालेय खेळ महासंघ व भारतीय शालेय खेळ महासंघ, दिल्लीच्या वतीने आयोजित जागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील सिलेक्टेड टीम मध्ये फ्रान्सवर मात करून उपविजेतेपद मिळवले.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीतील बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील सिलेक्टेड टीम मध्ये मुलांच्या गटात एकूण सात संघ सहभागी झाले होते. यात चायनीज तैपेईने गटातील सहाच्या सहा लढती जिंकून विजेतेपद मिळवले. यानंतर भारत अ संघाने गटातील सहा पैकी पाच लढती जिंकल्या आणि दुस-या स्थानी राहून उपविजेतेपद मिळवले. भारताला गटातील लढतीत चायनीज तैपेईकडून पराभव पत्करावा लागला. यानंतर मात्र भारत अ संघाने चीन, ब्राझील, फ्रान्स, यूएई आणि भारत ब संघाला नमविले.
यात रविवारी झालेल्या गटातील अखेरच्या लढतीत भारताने फ्रान्सवर ३-२ ने विजय मिळवला. यातील दुहेरीच्या पहिल्या लढतीत केन्जी लोव्हँग-विलियम व्हिलेगर जोडीने रितूपर्णा बोरा-पारस माथूर जोडीवर २१-१३, २३-२१ अशी मात करून फ्रान्सला १-० अशी आघाडी मिळवून दिली. दुहेरीच्या दुस-या लढतीत तरुण मन्नेपल्ली-वरुण त्रिखा जोडीने मार्टिन क्वाझेन-लैलना राहरी जोडीवर १६-२१, २६-२४, २१-१९ असा विजय मिळवला आणि भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली. ही लढत ५४ मिनिटे चालली. यानंतर एकेरीत तरुणने लेओवर २१-१७, १७-२१, २१-७ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला आणि भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.
वरुणने मार्टिनवर १७-२१, २७-२५, २१-१५ असा विजय मिळवला आणि भारताला ३-१ अशी विजयी आघाडी मिळवून दिली. ही लढत जवळपास एक तास चालली. वरुणने पराभवाच्या उंबरठ्यावरून विजय खेचून आणला. वरुणने पहिली गेम गमावली. यानंतर दुस-या गेममध्ये सुरुवातीपासूनच दोघांमध्ये प्रत्येक गुणासाठी चुरस बघायला मिळाली. यानंतर २५-२५ अशी बरोबरी असताना वरुणने सलग दोन गुण घेत बाजी मारली आणि आपले आव्हान राखले. आत्मविश्वास उंचावलेल्या वरुणने निर्णायक गेममध्ये मार्टिनला संधीच दिली नाही. यानंतर एकेरीतील अखेरच्या लढतीत विलियमने मोनिमुग्धा राजकंवरला २१-१२, १५-२१, २१-१४ असे पराभूत केले, पण त्याचा निकालावर काही परिणाम झाला नाही.
शालेय गटात भारत ब संघाचा पराभव
जागतिक शालेय मुलांच्या गटात भारत ब संघाला ब्राझीलकडून ०-५ असा पराभव पत्करावा लागला. यात दुहेरीत पेड्रो टिटो-थिअॅगो मोझेर जोडीने मिहिर-नमराज जोडीवर २१-३, २१-११ अशी, तर लुकास सिल्वा-मॉईसेस लिमा जोडीने अभिनव-अर्णव जोडीवर २१-४, २१-१२ अशी मात करून ब्राझीलला २-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर एकेरीत थिअॅगोने मिहिरला २१-५, २१-७ असे पराभूत करून ब्राझीलला ३-० अशी विजयी आघाडी मिळवून दिली. यानंतर पेड्रोने मिहिरला २१-३, २१-७ असे, तर मॉइसेसने अभिनवला २१-११, २१-११ असे पराभूत करून ब्राझीलला निर्भेळ यश मिळवून दिले.
निकाल : शालेय मुली : १) बल्गेरिया – ५ वि. वि. जॉर्जिया – ० (असाया-व्हॅलेंटिया वि. वि. निनो-लिले २१-१७, २१-१५; व्हिक्टोरिया-मिहाएला वि. वि. लिझी-केटी २१-६, २१-३; व्हॅलेंटिया वि. वि. लिली लँचावा २१-१०, २१-१०; मिहाएला वि. वि. निनो गोदेरिद्ज २१-११, २१-८; व्हिक्टोरिया वि. वि. लिझी २१-४, २१-५).
२) चायनीज तैपेई – ५ वि. वि. क्रोएशिया – ० (सिन यू सिए-चिएह जुंग वू वि. वि. तिहाना डोको-इंगा सॅडेक २१-८, २१-७; फँग चू चेन-शिन यू वांग वि. वि. माजा बॅलेनोविच-डोरोटी सॅफ्रानिक २१-१, २१-५; सिए वि. वि. इंगा २१-१०, २१-१४; वू वि. वि. तिहाना २१-७, २१-८; जोयू त्झू चेन वि. वि. सॅफ्रानिक २१-१, २१-६).
शालेय मुले : १) फ्रान्स – ४ वि. वि. इंग्लंड – १ (दिमित्री-फॅबिएन पराभूत वि. अॅलेक्स-टॉबी २१-१८, १३-२१, १८-२१; थॉमस-अॅलेक्सिस वि. वि. मायकेल ली-इयान शांग २१-९, २१-१०; दिमित्री वि. वि. अॅलेक्स २१-१२, २१-१४; अॅलेक्सिस वि. वि. टॉबी २१-१३, २१-१०; थॉमस फोरकेड वि. वि. मायकेल ली २१-९, २१-७).
२) चायनीज तैपेई – ५ वि. वि. बल्गेरिया – ० (हुंग टिंग डू-यू चिए लिन वि. वि. ज्हॅन दिमित्रोव-स्टॅनिस्लाव ज्लानकोव २१-१४, २१-६; काई वेन चेंग-चिह वेई लू वि. वि. अतनास-यॉर्डन २१-२, २१-२; हुंग टिंग डू वि. वि. स्टॅनिस्लाव २२-२०, २१-४; लीन वि. वि. दिमित्रोव २१-९, २१-६; चेन वि. वि. अतनास २१-९, २१-४).
सिलेक्टेड टीम – मुले – अंतिम गुणतक्ता
संघ सामने विजय पराभव गुण
चायनीज तैपेई ६ ६ ० १२
भारत अ ६ ५ १ १०
फ्रान्स ६ ४ २ ८
चीन ६ ३ ३ ६
भारत ब ६ २ ४ ४
ब्राझील ६ १ ५ २
यूएई ६ ० ६ ०