तब्बल दोन वर्षांपासून, ज्या गोष्टीची सगळे क्रिकेटप्रेमी वाट पाहत होते तो दिवस काल (१८ जून) उजाडला होता. काल दुपारी ३ वाजता भारत आणि न्यूझीलंड संघ संपूर्ण तयारी करून साउथम्पटन येथे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यास सज्ज झाले होते. परंतु पावसाने पूर्ण उत्साहावर पाणी फेरले. तसे तर ही गोष्ट काही नवीन नाही की, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे(आयसीसी)च्या स्पर्धेत जेव्हा भारत विरुद्ध न्यूझीलंड लढत असेल; तेव्हा पावसाचे आगमन होणार नाही.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलयमसन हे दोघे गेले २-३ वर्षांपासून आपआपल्या संघासाठी आयसीसीच्या स्पर्धेत कर्णधारपद भूषवत आहेत. कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यापुर्वीही दोघांना एकमेकांविरुद्ध खेळताना पावसाचा सामना करावा लागला आहे. आता सलग तिसऱ्या वेळेस आयसीसीच्या स्पर्धेत असे झाले आहे.
२०१९च्या विश्वचषक सामन्यात भारतीय संघाचा साखळी फेरीतील सामना १३ जून रोजी नॉटिंघम येथे खेळवण्यात येणार होता. त्या सामन्यात सुद्धा सामना सुरु होण्यापूर्वी पावसाने जोरदार फलंदाजी केली होती. त्यामुळे एकही चेंडू न टाकता सामना रद्द करावा लागला. हा विश्वचषकाचा १८वा साखळी सामना होता. तेव्हा पंचांनी आणि सामना अधिकाऱ्यांनी सामना सुरु करण्यासाठी फार प्रयत्न केले होते. परंतु, सामना काही सुरु झाला नाही. त्यामुळे दोन्ही संघांना १-१ गुण दिले गेले.
तसेच, २०१९च्या विश्वचषकात भारतीय संघाला पुन्हा उपांत्यफेरीत न्यूझीलंड संघाचा सामना करायचा होता. हा सामना ९ जुलैला खेळला गेला होता. त्या सामन्यात सुद्धा पावसाने व्यत्यय आणलेच, पण जरा उशिरा. न्यूझीलंडचा कर्णधार विलीयमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय केला. ४६.१ षटकात न्यूझीलंडने २११/५ धावा केल्या होत्या. ४७वे षटक चालू असताना पावसामुळे खेळ रद्द करावा लागला. उपांत्यफेरीचा सामना असल्यामुळे या सामन्या साठी अतिरिक्त दिवस(रिजर्व डे) ठेवण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी न्यूझीलंड संघाने ५० षटकात २३९/८ धावा केल्या. भारतीय संघाने तो सामना गमावला होता.
त्यामुळे आता विश्वकसोटी अजिंक्यपद स्पर्धेत दुसऱ्या दिवशीचा सामना तरी नीट पार पडतो का? या गोष्टीवर सगळे क्रिकेटप्रेमी नजर ठेऊन आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
पावसामुळे टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार बदल? क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाने दिले उत्तर
WTC Final, भारत वि. न्यूझीलंड: पहिल्या दिवशी पाऊस बनला खलनायक, ‘या’ नियमांनुसार होणार पुढील खेळ
माजी इंग्लिश कर्णधाराची बोचरी टीका, म्हणाला, “साऊथम्पटनमध्ये वातावरणामुळे भारतीय संघ वाचला”