---Advertisement---

कर्णधार कोहलीचा पंतला पूर्ण पाठिंबा; म्हणाला, ‘त्याने असेच खेळत राहावे, हीच आमची इच्छा’

On: गुरूवार, जून 24, 2021 10:54 PM
---Advertisement---

पहिली जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २ वर्षांच्या कालावधीनंतर २३ जून २०२१ रोजी समाप्त झाली आहे. न्यूझीलंड संघाने भारताचा ८ गडी राखून पराभव करुन जागतिक कसोटी अजिंक्यपद मिळवले. भारतीय संघाच्या फलंदाजांना दोन्ही डावात आपली चमक दाखवता आली नाही. कोणत्याही भारतीय फलंदाजाला अर्धशतक करता आले नाही. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले होते.

अनेक भारतीय चाहत्यांची नजर भारतीय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतवर होती, परंतु त्याला अपेक्षित अशी कामगिरी करता आली नाही.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील भारतीय यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतच्या कामगिरीवर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. रिषभ पंत न्यूझीलंडविरुद्धच्या दोन्ही डावात चुकीचे फटके खेळत बाद झाला. तथापि, विराट कोहलीने त्याच्यावर पूर्ण विश्वास दर्शवत म्हटले आहे की भारतीय संघ पंतला पूर्ण साथ देईल आणि तो त्याचा जो नैसर्गिक खेळ आहे त्याला तसे खेळू देईल.

रिषभ पंतने भारताच्या दुसर्‍या डावात सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने ८८ चेंडूत ४१ धावा केल्या. तथापि, मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न करताना त्याने विकेट गमावली. पंतने पुढे जाऊन शॉट खेळण्याच्या प्रयत्न केला, पण चेंडू बॅटला नीट लागला नाही आणि तो झेलबाद झाला. अशा प्रकारे, पंतने महत्त्वपूर्ण क्षणी आपली विकेट गमावली.

पत्रकार परिषदेत विराट म्हणाला, “रिषभ पंतला जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तो नक्कीच त्याचा खेळ दाखवेल. जेव्हा गोष्टी आपल्या बाजूने जात नाहीत, तेव्हा आपण असे म्हणायला सुरुवात करतो की त्याची चूक होती. पण हे सर्व खेळात चालू असते. पंतची सकारात्मकता आणि त्याची खेळण्याची पद्धत बदलू इच्छित नाही. हेच त्याला वेगळे बनवते. त्याने असेच खेळत रहावे अशी आमची इच्छा आहे. विरोधी संघावर दबाव आणणे आणि धावा जलदगतीने करणे, हा त्याचा नैसर्गिक खेळ आहे.”

विराट कोहली पुढे म्हणाला, “आम्हाला पंतची फारशी चिंता नाही. हा चुकीचा शॉट आहे की नाही हे त्याच्यावर अवलंबून आहे. भारतीय संघात त्याची दीर्घ कारकीर्द आहे आणि भविष्यात तो भारतीय संघासाठी सतत सामने जिंकवू शकतो.”

भारतीय संघाला आता ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेची तयारी करायची आहे.

महत्वाच्या बातम्या

आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंड भारताविरुद्धच्या सामन्यात नेहमीच ‘ड्रायव्हिंग सीटवर’, पाहा गेल्या २ दशकातील निकाल

‘टीम इंडिया क्रिकेट विश्वातील नवा चोकर’, चाहत्यांकडून सोशल मीडियावर कडाडून टीका; मीम्सही व्हायरल

ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार ठरल्यानंतर रॉस टेलरला आनंदाश्रू अनावर, मुलाखतीतही खूप रडला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---