कपिल देव यांच्या नेतृत्वात भारताने १९८३ चा क्रिकेट विश्वचषक जिंकला आणि संबंध भारत देशात क्रिकेटचे सोनेरी दिवस सुरू झाले. प्रत्येकाच्या तोंडी कपिल देव, सुनिल गावसकर, मोहिंदर अमरनाथ यांची नावे होती. चित्रपटांत नायक होण्याचे स्वप्न पाहणारी मुले, आता भारतासाठी विश्वचषक जिंकण्याची स्वप्ने पाहू लागली होती. विश्वचषक विजयाच्या जल्लोषातून लोक बाहेर आले नव्हते, तोच पुढील १९८७ चा विश्वचषक भारतात आयोजित करण्याचे ठरले. यावेळी, विश्वचषक प्रथमच इंग्लंडच्या बाहेर खेळला जाणार होता. भारत व पाकिस्तान या दोन देशात विश्वचषकातील सामने खेळण्याचे ठरवले गेले. या सामन्याच्या स्थानांपैकी एक स्थान होते, मुंबईतील वानखेडे स्टेडियम. याच, वानखेडे स्टेडियमवर १७ ऑक्टोबर १९८७ ला एक सामान्य घटना घडली. या घटनेत त्यावेळी विशेष असे काहीच नव्हते. मात्र, काही वर्षांनी ती घटना भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक ऐतिहासिक घटना ठरली.
विश्वचषकातील भारताचा तिसरा सामना झिम्बाब्वे विरुद्ध वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात होता. भारताला पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून अवघ्या एका धावेने पराभव पत्करावा लागला होता. दुसऱ्या सामन्यात भारताने पुनरागमन करत न्युझीलंडला मात दिली. त्यानंतर, हा भारताचा तिसरा सामना होता. खेळपट्टीचा अंदाज घेत, नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेचे कर्णधार ट्रायकॉस यांनी फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून अवघे दोन वेगवान गोलंदाज खेळणार होते. त्यापैकी एक होते स्वत: कपिल देव आणि दुसरे मनोज प्रभाकर.
… आणि इतिहास घडत होता
झिम्बाब्वेच्या सलामीवीरांचा सामना करण्यासाठी कपिल देव यांनी चेंडू हातात घेतला. भारताचे सर्वात अनुभवी खेळाडू सुनील गावसकर हे पहिल्या षटकावेळी स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करत होते. तर, १४ वर्षाचा एक मुंबईकर मुलगा सीमारेषेपलीकडे बॉल बॉय म्हणून उभा होता. हा मुलगा म्हणजे, पुढे जाऊन भारताचा सर्वोत्तम फलंदाज बनलेला सचिन तेंडुलकर.
टेलिव्हिजनवर सामना पाहणाऱ्या किंवा अगदी वानखेडे स्टेडियमवर उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांनासुद्धा याची कल्पना नव्हती की, ते एका इतिहासाचा भाग बनत आहेत. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील तीन सर्वात मोठी नावे सुनील गावसकर, कपिल देव आणि सचिन तेंडुलकर हे प्रथमच विश्वचषकातील सामन्यात एकत्र मैदानात होते. सुनील गावसकर आणि कपिल देव यांनी १९७९, १९८३ आणि १९८७ असेल तीन विश्वचषक एकत्र खेळले आणि कपिल देव आणि सचिन तेंडुलकर हे १९९२ विश्वचषक स्पर्धेत एका संघात होते. या १९८७ विश्वचषक स्पर्धेच्या आधी किंवा नंतर हे तीन दिग्गज कधीही एकत्ररित्या मैदानावर दिसले नाहीत.
सचिनने ताजी केली आठवण
ही घटना कपिल देव किंवा सुनील गावसकर यांना आठवत नाही. कारण, प्रत्येक सामन्यावेळी, प्रत्येक मैदानावर असे बॉल बॉय असतातच. मात्र, सचिनने एका मुलाखतीत, या घटनेची आठवण करून दिली होती. त्या घटनेविषयी सांगताना सचिन म्हणाला, “त्या झिंबाब्वे विरुद्धच्या विश्वचषकातील सामन्यात मी बॉल बॉय होतो. मी अगदी भारतीय ड्रेसिंग रूमच्या बाजूला उभा असतो. त्या वेळचे सर्व खेळाडू म्हणजेच सुनील गावसकर, कपिल देव, दिलीप वेंगसरकर, मोहम्मद अजहरुद्दिन या सर्वांना मी खूप जवळून पाहिले होते.”
महा स्पोर्ट्सचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
मनोज प्रभाकर यांची भेदक गोलंदाजी आणि झिम्बाब्वे ढेर
भारताने तो सामना एकतर्फी आपल्या खिशात घातला होता. मनोज प्रभाकर यांनी ४ बळी घेत झिम्बाब्वेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले होते. झिम्बाब्वेची अवस्था ४ बाद १३ असताना, ऍण्डी पायक्रॉफ्ट यांनी एक बाजू लावून धरत, आधी ऍण्डी मिलर यांच्यासह ३४ तर बाबू मेमन यांच्यासह ३१ धावा त्यांनी जोडल्या. माल्कम जार्विस यांच्यासह डावातील सर्वात मोठी ३६ धावांची करत त्यांनी, झिम्बाब्वेची धावसंख्या १३५ पर्यंत नेली. पायक्रॉफ्ट यांनी सर्वाधिक ६१ धावा फटकावल्या. भारताकडून मनोज प्रभाकर यांनी चार तर मनिंदर सिंह यांनी तीन बळी आपल्या नावे केले.
भारताचा सहज विजय
विजयासाठी १३६ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताला, कृष्णम्माचारी श्रीकांत आणि सुनील गावसकर यांनी ७६ धावांची सलामी दिली. सिद्धू यांच्याऐवजी मनोज प्रभाकर यांना तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठविण्याचा निर्णय भारतीय संघाच्या काहीसा अंगाशी आला. प्रभाकर यांनी अतिशय संथ खेळी करत, ४१ चेंडूत नाबाद ११ धावा काढल्या. भारताने हा सामना १३३ चेंडू राखून जिंकला.
स्पर्धेत पुढे ‘हे’ घडले
साखळी फेरीतील सर्वच्या सर्व सहा सामने गमावत झिम्बाब्वेचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला. दुसरीकडे, भारतीय संघाने अ गटातून अव्वल स्थान पटकावले. उपांत्य सामन्यात भारताची गाठ वानखेडे स्टेडियमवरच, इंग्लंडशी पडली. ज्यामध्ये, भारताला पराभवाचा सामना करावा लागला. योगायोगाने, या सामन्यातदेखील सचिन पुन्हा एकदा बॉल बॉय म्हणून मैदानावर हजर होता.
वाचनीय लेख-
–धन्यवाद आणि गुडबाय! सचिन बोलत होता अन् वानखेडेवर चाहते रडत होते
–आणि शाहरुखने पुन्हा वानखेडेवर नाही ठेवले पाऊल
–वानखेडेवर झालेल्या पराभवामुळे संगकाराची झाली तब्बल ५ तास चौकशी, नाराज संगकारा