लंडन। 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकातील इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात झालेल्या अंतिम सामन्यात सुपर ओव्हरही बरोबरी सुटल्यानंतर बाऊंड्रीच्या फरकांमुळे इंग्लंडने विश्वचषक विजयाचे स्वप्न पूर्ण केले आहे. त्यामुळे क्रिकेट जगताला आता इंग्लंडच्या रुपाने नवा विश्वविजेता मिळाला आहे.
या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 241 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडला विजयासाठी 50 षटकात 242 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडलाही 50 षटकात सर्वबाद 241 धावाच करता आल्या.
या सामन्यात विजयासाठी शेवटच्या चेंडूवर न्यूझीलंडला 1 विकेटची तर इंग्लंडला 2 धावांची गरज होती. यावेळी बेन स्टोक्स आणि मार्क वूड 2 धावा घेण्यासाठी धावला परंतू दुसरी धाव घेताना वूड धावबाद झाला त्यामुळे या सामन्यात बरोबरी झाली. त्यामुळे सुपर ओव्हर घेण्यात आली.
सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडकडून फलंदाजी करण्यासाठी आलेल्या जॉस बटलर आणि बेन स्टोक्सने 15 धावा करत न्यूझीलंडसमोर विजयासाठी 16 धावांचे लक्ष्य ठेवले. न्यूझीलंडकडून जिमी निशाम आणि मार्टिन गप्टिलने सुपर ओव्हरच्या शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज दिली पण त्यांनाही शेवटच्या चेंडूवर 2 धावा घेण्यात अपयश आले आणि सुपर ओव्हरही बरोबरीत संपली.
त्यामुळे इंग्लंडने न्यूझीलंडच्या तुलनेत आधीक बाऊंड्री मारल्याने इंग्लंडला विश्वविजेते घोषित करण्यात आले.
या सामन्यात इंग्लंडने 242 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सुरुवातीला पहिल्या चार फलंदाजांच्या नियमित कालांतराने विकेट गमावल्या होत्या. त्यामुळे त्यांची आवस्था 23.1 षटकात 86 धावात 4 विकेट अशी झाली होती.
पण त्यानंतर बेन स्टोक्स आणि जॉस बटलरने इंग्लंडचा डाव सांभाळताना पाचव्या विकेटसाठी 110 धावांची शतकी भागीदारी रचली. पण 45 व्या षटकात लॉकी फर्ग्यूसनच्या गोलंदाजीवर राखीव क्षेत्ररक्षक टीम साऊथीने 59 धावांवर खेळणाऱ्या बटलरचा सुरेख झेल घेत ही जोडी फोडली.
अखेर नंतर पुन्हा इंग्लंडच्या फलंदाजांनी पुन्हा नियमित अंतराने विकेट गमावल्या. त्यामुळे या सामन्यात बरोबरी झाली. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्यूसन आणि जेम्स निशाम यांनी सर्वाधिक प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.
तत्पूर्वी, न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना मार्टिन गप्टिलची विकेट लवकर गमावली. पण त्यानंतर कर्णधार केन विलियम्सनने आणि हेन्री निकोल्सने दुसऱ्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी केली. मात्र लियाम प्लंकेटने विलियम्सनला 30 धावांवर बाद करत ही जोडी फोडली.
तर काहीवेळात 55 धावा करुन निकोल्सही बाद झाला. पण टॉम लॅथमने जेमी निशाम(19), कॉलिन डी ग्रँडहोम(16) यांना साथीला घेत न्यूझीलंडला 230 धावांचा टप्पा पार करुन दिला. लॅथमने 47 धावांची छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळी केली. पण त्याला ख्रिस वोक्सने बाद केले. अखेर न्यूझीलंडने 50 षटकात 241 धावांचा टप्पा गाठला.
इंग्लंडकडून ख्रिस वोक्स आणि लियाम प्लंकेटने सर्वाधिक प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच जोफ्रा आर्चर आणि मार्क वूडने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–जो रुटने फलंदाजीत नाही तर आज क्षेत्ररक्षणात केला मोठा विश्वविक्रम
–मैदानात पाऊल ठेवताच केन विलियम्सनचा या दिग्गज कर्णधारांच्या खास यादीत झाला समावेश
–१२ वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम मोडत कर्णधार विलियम्सनने रचला मोठा इतिहास