क्रिकेट सामन्यांदरम्यान हवामानासंबंधी अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. अनेक वेळा पावसामुळे महत्त्वाचे सामने रद्द करावे लागतात. अशा परिस्थितीत क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियात जगातील पहिलं ‘ऑल वेदर इनडोअर क्रिकेट स्टेडियम’ बांधलं जाणार आहे, जेणेकरुन कितीही खराब हवामानामुळे सामन्यात अडथळा येणार नाही. हे स्टेडियम ऑस्ट्रेलियाच्या टास्मानिया बेटावर बांधलं जाणार आहे.
या स्टेडियमचं नाव मॅक्वेरी पॉइंट स्टेडियम असून त्याची आसनक्षमता 23,000 असेल. स्टेडियमचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं छत पारदर्शक असेल, ज्यामुळे मैदानावर प्रकाश येत राहील. या स्टेडियमचं छत अशा पद्धतीनं तयार करण्यात येणार आहे की क्रिकेटचा चेंडू त्यावर आदळणार नाही. म्हणजे खेळ थांबवण्याचं कारणच उरणार नाही!
टास्मानिया बेटाचा सागरी वारसा लक्षात घेऊन या स्टेडियमची रचना करण्यात आली आहे. याशिवाय आदिवासी लोकांच्या सूचनाही ऐकल्या गेल्या आहेत. स्टेडियममध्ये प्रेक्षकांसाठी विशेष सुविधा असतील, जसं की 1500 लोकांसाठी फंक्शन रूम, जिथून ‘माउंट वेलिंग्टन’चं सुंदर दृश्य देईल. याशिवाय स्टेडियममध्ये मैफिली आणि इतर कार्यक्रमही होऊ शकतात.
या प्रकल्पाबाबत काही वाद आहेत. मैदानासाठी निवडलेली जागा योग्य नसल्याचं काही लोकांचं मत आहे. पण, या स्टेडियमच्या उभारणीबाबत बहुतांश लोकांमध्ये उत्साह आहे. 2028 पर्यंत हे स्टेडियम तयार होईल आणि क्रिकेट चाहत्यांना वर्षभर क्रिकेटचा आनंद घेता येईल, अशी अपेक्षा आहे.
ऑस्ट्रेलियाच्या क्रीडा आणि कार्यक्रम मंत्री यांनी ही माहिती दिली आहे. क्रीडा आणि कार्यक्रम मंत्री निक स्ट्रीट म्हणाले की, या स्टेडियमच्या बांधकामामुळे टस्मानियन संघांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडियाला मिळाला नवा ‘सिक्सर किंग’, अभिषेक शर्मानं मोडला हिटमॅनचा मोठा विक्रम
विराट कोहलीच्या रेस्टॉरंटवर पोलिसांची कारवाई, रात्री 1.30 वाजेपर्यंत सुरू होता धुमाकूळ
डेव्हिड वॉर्नरला निवृत्ती मागे घ्यायची आहे? सूचक इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल